शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणामुळे भाजपचे आमदार नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनाने आज सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नितेश राणे यांचा कोठडीतील मुक्काम एक दिवस आणखी वाढला. त्यातच शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी राणे घराण्याची खिल्ली उडवली आहे.
नितेश राणे गेले चार दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सर्वत्र सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा एक दिवस कोठडीतील मुक्काम वाढला असून, उद्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. यावर, शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी औरंगाबाद मध्ये एका मेळाव्यात बोलताना त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
औरंगाबाद मध्ये शिवसेना महिला आघाडीच्या मेळाव्यात मनीषा कायंदे बोलत होत्या. यावेळी, त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे नारायण राणे जेलमध्ये गेले. त्यांचा दुसरा मुलगा दोन वेळा जेलमध्ये जाऊन आला, आणि आता सध्या एक मुलगा जेलमध्ये आहे. नारायण राणे यांच्या मुलाला हिसका दाखवला आणि पायरी दाखवली . असं वक्तव्य त्यांनी केले.
नुकतेच 18 फेब्रुवारी पर्यंत नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, नितेश राणे यांनी प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.
दीपक केसरकर म्हणाले होते की, तुरुंगात जाऊ नये म्हणून अनेक लोकांच्या तब्येती बिघडतात, मग ते तुरूंगाऐवजी हॉस्पिटलमध्ये जातात. पण, जेव्हा मी गृहराज्यमंत्री होतो, तेव्हा या खात्याचा अनुभव घेतला आहे. मला असे अनेक अनुभव आले आहेत.
एक दिवस जेलमध्ये जाणं काय असतं हा अनुभव वेगळा असतो आणि नितेश राणे यांनी तो घेतला असता तर पुढील आयुष्यात त्यांनी वाईट कृत्य करण्याची त्यांची हिंमत झाली नसती. अशी जोरदार टीका दीपक केसरकर यांनी राणे यांच्यावर केली होती.