मागील वर्षी आई – मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली होती. दारूच्या नशेत मुलाने आपल्या जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दारूच्या नशेत कोणाकडून काय कृत्य होईल याचा नेम नाही. अशीच एक धक्कादायक घटना घडली होती, ज्याचा निकाल आज लागला आहे.
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षी दारूच्या नशेत एका नराधम मुलाने आईवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आईवर बलात्कार करणारा हा मुलगा त्यावेळी 22 वर्षांचा होता.
बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव प्रवीण बिसेन असे आहे. पीडित महिला म्हणजेच प्रवीणची आई तिच्या पतीसोबत पटत नसल्याने मागील आठ वर्षांपासून राजेगावात आपल्या दोन मुलांसोबत राहत होती. कष्ट करून एकटी त्यांचा संभाळ करत होती.
पतीपासून वेगळं राहिल्यानंतर मिळेल ते काम करून आपली आणि आपल्या मुलांची उपजीविका करायची. मोठ्या मुलाची संगत चांगली नसल्याने त्याला दारूचे व्यसन लागलं. गावात सतत दारू पिऊन पडून राहायचा. घटनेच्या दिवशी असाच दारू पिऊन प्रवीण घरी आला आणि दारूच्या नशेत त्याने आपल्या आईचा बलात्कार केला.
त्यानंतर, पीडित आईने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी तातडीने आरोपी प्रावीणला अटक केली होती. त्यानंतर रावणवाडी पोलीस या घटनेचा तपास करत होती. या केस संदर्भात 19 जानेवारी रोजी न्यायालयात पुरावे सादर करण्यात आले होते.
19 जानेवारी रोजी न्यायालयात पुरावे सादर केल्यानंतर, 24 जानेवारीला आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला. त्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया होऊन, 31 जानेवारी रोजी अंतिम सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान आरोपी प्रवीणला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा घोषित केली. सोबत आरोपीला दोन हजार दंड आणि पीडित महिलेला दोन लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.






