एका नवविवाहित दाम्पत्याच्या गाडीचा अपघात होऊन दोघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्न होऊन एक महिनाही उलटला नाही,तोवरच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबातील सदस्य आणि एकूणच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित घटना नागपूर जिल्ह्यातील आहे. नागपूर जिल्ह्यातील गुमगाव याठिकाणी ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील नवविवाहित दाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या लग्नाला एक महिना देखील पूर्ण झालेला नव्हता. नवविवाहित दाम्पत्याच्या हातावरील पूर्ण मेहंदी देखील गेली नसताना, काळाने त्यांच्यावर घाला घातला.
मृत दाम्पत्याची नावे हिमांशू देवानंद राऊत आणि निकिता राऊत असे आहेत. हिमांशू 22 वर्षांचा होता, तर निकिताचे वय 21 वर्ष होते. दोघांच्या संसाराला त्यांनी अजून ठिकशी सुरुवातही केली नाही,आणि त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघेही वयाने कमी असल्याने दोन्ही कुटुंबात त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेच्या दिवशी म्हणजेच 29 जानेवारी रोजी हिमांशू आपल्या पत्नीला दुचाकीवर घेऊन आपल्या आत्याच्या मुलीला भेटायला जात होता. त्याच्या आत्त्याच्या मुलीचे गाव बोरखेडी नजीक तारसी येथे आहे. त्याने रस्त्यात आपल्या दुचाकीने चार चाकी वाहनाला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला.
त्यादरम्यान, रस्त्यात रुईखैरी शिवारातील हैद्राबाद-नागपूर मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे एकतर्फी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. असे असताना हिमांशूने चार चाकी वाहनाला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी विरोधी दिशेने येणार ट्रेलर त्याला दिसला नाही. त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले.
त्यामुळे त्याची गाडी थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरवर जाऊन आदळली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात घडताच जवळच्या एका टोल प्लाझावरील टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हिमांशू आणि निकिता यांना बुटीबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, रुग्णालयात पोहचताच हिमांशू ने प्राण सोडले. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर, निकिता वरती उपचार सुरू असताना तिने उपचारादरम्यान आपले प्राण सोडले. संबंधित घटनेची नोंद बुटीबोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस घेत आहेत.