गोव्यात विधानसभा निवडणुकीआधीच मोठा राजकीय भुंकप झाला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (utpal parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी भाजपाला अखेर रामराम केला आहे. शुक्रवारी उत्पल पर्रिकर यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आता आगामी काळात पणजी विधानसभा मतदारसंघातून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. (utpal parrikar leaves bjp)
उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उत्पल पर्रिकर यांनी आपल्याला पणजी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती, मात्र पक्षाने त्यांना पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आणि वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली.
त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. पर्रिकर कुटुंबातील सदस्याने भाजपा (bjp) सोडल्याने त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.
तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांनाच उमेदवारी जाहीर केली. तसेच उत्पल पर्रिकर यांच्यासमोर पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला होता.
मात्र उत्पल पर्रिकर पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यामुळे पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली. दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मी पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे उत्पल यांनी सांगितले. जागा जाहीर करताना उत्पल म्हणाले की, मी सत्तेसाठी किंवा कोणत्याही पदासाठी लढत नाही, मी माझ्या वडिलांच्या मूल्यांसाठी लढत आहे, भाजपचे जुने कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. मी खूप मोठी रिस्क घेतली आहे.
मी फार कठीण मार्ग निवडला आहे. माझ्या करियरवर खूप जणांनी चिंता व्यक्त केली आहे. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल, असंही उत्पल पर्रीकर म्हणाले. गेल्यावेळीही मला संधी नाकारली आहे. आताही नाकारले आहे. इथल्या लोकांना माहिती आहे. हा मनोहर पर्रीकरांच्या पार्टीतला निर्णय वाटत नाही. माझं काम नव्हतं तर इतर मतदार संघाचे पर्याय कसे दिले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कधी तरी जनतेसाठी थांबावं लागतं. मी अपक्ष लढतोय, माझं करिअर मी पणजीच्या लोकांच्या हातावर ठेवलं आहे, असं म्हणत त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी दाखवली आहे. उत्पल यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले नव्हते, त्यानंतर आम आदमी पक्षानेही उत्पल यांना ‘आप’च्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
मी पैसे देऊ शकलो नाही म्हणून मला भाजपने तिकीट दिले नाही; माजी मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप
सलमानच्या फार्म हाऊसवर कलाकारांना पुरलं जातं; सलमान खानच्या शेजाऱ्याने केले गंभीर आरोप
पाच लाख दे नाहीतर माझ्यासोबत.., पोलीस उपनिरीक्षकाने घेतला महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा
माजी मुख्यमंत्र्यासहीत तीन बड्या नेत्यांची बंडखोरी; भाजपला भलेमोठे भगदाड