बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार ‘सौरव गांगुली’ यांना कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. लसीचे दोन्ही डोस मिळूनही त्यांना सोमवारी संसर्ग झाला आणि त्यानंतर त्यांना वुडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र, चार दिवसांच्या उपचारानंतर आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. गांगुली सध्या त्यांच्या घरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसोलेशनमध्ये आहे.
दुसरीकडे, शनिवारी बीसीसीआय अध्यक्षांना कोविड-19 च्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने संसर्ग झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी गांगुली यांचा नमुना घेण्यात आला होता आणि तपासणीनंतर त्यांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
रुग्णालयाच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘गांगुली यांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली होती. आम्ही त्यांच्यावर उपचार करत आहोत असे त्यांनी सांगितले.’
सोमवारी रात्री गांगुलीला कोविड-19 ची लागण झाल्यानंतर वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल थेरपी देण्यात आली, त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. रुग्णालयाने बुधवारी जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दादांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले.
हॉस्पिटलने जारी केलेल्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, “BCCI अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली हेमोडायनामिकली स्थिर आहे आणि त्यांना ताप नाही, सोबतच त्यांची ऑक्सिजन पातळी देखील सामान्य आहे. रात्री त्यांना चांगली झोप लागली आणि त्यांनी सकाळी नाश्ता आणि जेवणही केले.
वुडलँड हॉस्पिटलने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही आज दुपारी गांगुलीला डिस्चार्ज दिला आहे. त्यांना जवळपास दोन आठवडे डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच वेगळे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील उपचाराबाबत निर्णय घेतला जाईल.
49 वर्षीय गांगुली एका वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात पोहोचले होते. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.