काही लोक कमी वेळेत अधिक मालामाल होण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. वेळ आली तर ते गुन्हेगारीच्या वाटेवर देखील जातात. अशीच एक घटना समोर आली असून, पैशासाठी डॉलरची बनावट नोट दाखवून एक टोळी लोकांकडून भारतीय चलन घेऊन फसवणूक करत होती. या टोळीला सध्या पोलिसांनी अटक केली आहे.
पैशासाठी लोकांची फसवणूक करणारी ही टोळी तेलंगणा मधील आहे. अमेरिकन डॉलरची बनावट नोट दाखवून त्याच्या बदल्यात भारतीय चलन घेऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न ही टोळी करत होती. या टोळीला नांदेड गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून बनावट नोट, कार, रोख आदी साहित्य असा 11 लाख 52 हजार तीनशे पन्नास रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आपल्याकडे एक बिलियन डॉलर्सची नोट म्हणजेच भारतीय चलनातील साडेसातशे कोटी रुपये असल्याचे सांगून ते ही नोट पन्नास लाख रुपयांमध्ये विक्री करण्याचे आमिष दाखवित होते आणि लोकांना फसवत होते. वेळप्रसंगी पुढच्या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवत होती, धमकावत होती, आणि पैसे घेऊन पळून जात होती. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून या टोळीला जेरबंद केले.
माहितीनुसार, या टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारतीची एक पथक तयार केलं होतं. यावेळी भारती यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुरुद्वारा गेट नंबर एकच्या बाजूला बडपूरा येथे एर्टीगा गाडीत तेलंगणा राज्यातील पाच संशयित तरुण असल्याचे सांगितले. पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले.
माहितीनुसार, गर्दीचा फायदा घेत या टोळीतील दोघे पसार झाले.पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट, एक चाकू, एर्टीगा गाडी असा 11 लाख 52 हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भारती यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात या टोळीविरुद्ध कलम 399 सहित विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नाव , नंदकिशोर गालरेड्डी देवारम, महेश इल्लय्या वेल्लुटला, आनंदराव आयात्रा गुंजी,असे असून हे कामारेड्डी, आंध्र प्रदेश येथील रहिवासी आहेत. या प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.