काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीतील एका धक्कादायक माहितीचा खुलासा चव्हाण यांनी केला आहे.
२० जून रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपने आपल्या संख्याबळाहून एक अधिकची जागा निवडून आणली होती. तर काँग्रेसच्या पहिल्या क्रमाकाच्या उमेदवाराचा पराभवाचा धक्का बसला होता. त्यावेळी काँग्रेसच्या ११ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या ७ आमदारांनी भाजपकडून पैसे घेऊन त्यांना मतदान केल्याचं धक्कादायक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, चंद्रकांत हांडोरे या आमच्या सहकाऱ्यावर अन्याय झाला होता. या प्रकरणी मी कारवाईची मागणी केली होती. ज्यांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या निवडणुकीत आर्थिक व्यवहार झाले आहेत.
यावर पक्षाकडून समिती नेमण्यात आली आहे. त्याचा अहवालही पक्षश्रेष्ठींना सादर झाला आहे. मात्र यावर काय कारवाई होते याची आम्ही वाट पाहात असल्याचं चव्हाण यांनी सांगितले. तसेच म्हणाले, काँग्रेस पक्ष कुणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही. या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंद आहे.
आतापर्यंत गांधी कुटुंबाने काँग्रेसला जे दिले. त्यात समाधान मानले पाहिजे. हे मोगलांचे साम्राज्य नाही जी वारसा हक्काने मिळते. लोकशाही पद्धतीने नेमणुका होत नाहीत, या आरोपाचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. सोनिया गांधी अध्यक्ष असताना विजय मिळत गेला असे चव्हाण म्हणाले.
तसेच म्हणाले, आता मात्र पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. यावर आम्ही आधीच बोलायला पाहिजे होते. पक्षात लोकशाही मार्गाने निवडणूक घेऊन जे निवडून येईल ते सर्वमान्य केले पाहिजे. एकाच कुटुंबातील जास्त नको. काँग्रेस पक्षाला वाचवायचं असेल तर निवडणूक घ्यायला हवी अशी मागणी चव्हाण यांनी केली.