पुरवठा साखळीवरील दबावामुळे जगभरात लॅपटॉपसाठी वापरण्यात येणारी काच आणि सेमीकंडक्टरची कमतरता आहे. यामुळे भारतात लॉन्च झालेल्या लॅपटॉपची सरासरी किंमत देशात ६०,००० हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र, तरीही या महागाईमुळे लॅपटॉपच्या मागणीत काहीच घट झालेली नाही, असेच चित्र दिसते.
२०२२ च्या पहिल्या तिमाहीत, ५८ दशलक्ष संगणक शिपमेंट्स भारतीय बाजारपेठेत आल्या आहेत, जो आतापर्यंतचा एक विक्रम आहे. आता वेदांत समूह भारताच्या तंत्रज्ञान बाजारपेठेला नवी उंची देण्यासाठी सज्ज झाला आहे. वेदांत-फॉक्सकॉन गुजरातमध्ये देशातील पहिले सेमीकंडक्टर उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी सज्ज झाले आहे.
वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, देशात सेमीकंडक्टरच्या निर्मितीमुळे एक लाख रुपयांना विकला जाणारा लॅपटॉप ४०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत विकायला सुरुवात होईल. ते म्हणाले की१.५४ लाख कोटी रुपये खर्चून देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट सुरू केल्याने हे शक्य होईल.
अग्रवाल म्हणाले की, आतापर्यंत सेमीकंडक्टर फक्त तैवान आणि कोरियामध्ये बनवले जात होते, ते आता भारतातही बनवले जातील. आम्ही तैवानच्या इलेक्ट्रॉनिक पॉवरहाऊस कंपनी फॉक्सकॉनसोबत संयुक्त उपक्रम करून भारतात सेमीकंडक्टरचे उत्पादन सुरू करणार आहोत. या संयुक्त उपक्रमात फॉक्सकॉनची ३८ टक्के भागीदारी असेल, डिजिटल भविष्यासाठी आत्मनिर्भरता आवश्यक असल्याचे अग्रवाल म्हणाले.
वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्लांटमधून पुढील दोन वर्षांत सेमीकंडक्टरचे उत्पादन सुरू होईल. कंपनीला या व्यवसायातून $३.५ अब्ज उलाढाल अपेक्षित आहे. त्यापैकी एक अब्ज डॉलर्स सेमीकंडक्टरच्या निर्यातीतून येतील.
सध्या, भारत १००% सेमीकंडक्टर आयात करतो आणि वर्ष २०२०मध्ये, या आयटमवर १५ अब्ज डॉलर्स खर्च केले गेले. यापैकी ३७% चीनमधून आयात करण्यात आले. एसबीआयच्या एका अहवालात असेही म्हटले आहे की, जर भारताने चीनमधून आयात २० टक्क्यांनी कमी केली तर देशाच्या जीडीपीमध्ये आठ अब्ज डॉलरची वाढ होईल.