विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी दणक्यात कमाई केली. 11 मार्च रोजी ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या देशातील तीन राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. एवढी प्रसिद्धी मिळत असताना, आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काँग्रेसने या चित्रपटासंदर्भात वादग्रस्त ट्विट केले आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हापासून त्याची सोशल मीडियावर चर्चा झाली. स्पेशल स्क्रिनिंगमध्ये प्रेक्षकांचे डोळे पाणावले होते. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हा व्हिडीओ देखील शेअर केला होता.
चित्रपटाची माऊथ पब्लिसिटीही चांगली झाल्यामुळे या सर्वांचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसच्या कमाईवर झाला. चित्रपटाने दोन दिवसांत 12.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. एवढा प्रतिसाद भेटून देखील हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
चित्रपटासंदर्भात काँग्रेसने वादग्रस्त ट्विट केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. जम्मू काश्मीरमध्ये पंडितांपेक्षा मुस्लीम जास्त मृत्युमुखी पडलेत असा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे. हे ट्विट केरळ काँग्रेसने केले होते. ट्विटनंतर काँग्रेसला प्रश्न विचारण्यात आले. काँग्रेसने हे ट्विट डिलीट केले.
ट्विटमध्ये म्हटले होते की, ज्यांनी काश्मिरी पंडितांना निशाना बनवलं ते दहशतवादी होते. 1990 ते 2007 या 17 वर्षाच्या काळात दहशतवादी हल्ल्यात 399 पंडितांची हत्या झाली. याच काळात दहशतवाद्यांनी 15 हजार मुस्लिमांची हत्या केली होती. असे ट्विटमध्ये म्हंटले होते.
तसेच, काश्मीर खोऱ्यातून काश्मीर पंडितांचं पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशावर झाले होते, ते आरएसएस विचारसरणीचे होते. काश्मीर पंडितांचे पलायन भाजप पुरस्कृत विपी सिंह सरकारच्या काळात सुरू झालं. भाजपनं त्यावर काहीच केले नाही. यूपीए सरकारनं जम्मूमध्ये पंडितांसाठी घरं बनवली. शिवाय कुटुंबाला आर्थिक मदत दिली. असेही ट्विट मध्ये लिहिले होते.