मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपलाच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे. चक्क महापौरांसह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. (28 councilors including the mayor in ncp)
माजी आमदार रशिद शेख आणि महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. यावेळी पक्षांतर केलं म्हणजे आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो, अशी वेळ मी तुमच्यावर येऊ देणार नाही, असा शब्दही अजित पवार यांनी या नगरसेवकांना दिला.
तसेच यावेळी बोलताना नुसती भाषणं करून प्रश्न सुटत नाहीत, असा टोला देखील पवारांनी लगावला. “नवाब मलिकांकडे असलेल्या विभागाच्या माध्यमातून राज्यातल्या तरुणांना उभं करण्याचं काम आपण करतो. आपल्या समाजात इतरांच्या तुलनेत शिक्षण कमी आहे. त्यावर कसं काम करता येईल, त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मौलाना आझाद मंडळाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल, यासाठी काम केलं जात आहे”, असं पवार म्हणाले.
याचबरोबर तुम्ही सर्व नगरसेवकांनी शेख रशिद यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यावतीने तसेच संपूर्ण पक्षाच्या मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, असेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीत दाखल झालेल्या नगरसेवकांचे पवारांनी यावेळी कान टोचले. “आपल्याकडून कुठली चूक होऊ देऊ नका. कायद्याचं, नियमाचं उल्लंघन होणार नाही, ही खबरदारीही आपण घ्या. नाहीतर राष्ट्रवादी पक्षात आपण गेलोय, गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे, पालकमंत्री आपले आहेत, भुजबळ साहेब घरचे आहेत, प्रांताध्यक्ष आपले आहेत, अजित पवार आपले आहेत असं म्हणाल.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना रशिद शेख यांनी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर आरोप केला होता. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र बाळासाहेब थोरात वगळता कुठल्याही मंत्र्याकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आम्ही नाराज होतो. ऊर्जा मंत्रालय कांग्रेसकडे होते. मात्र मालेगावसाठी काहीही निर्णय झाला नाही. या सर्व कारणांमुळे आम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या
२०० फूट खोल दरीत कोसळूनही प्रवासी सुरक्षित, टाटाच्या कारची जबरदस्त कमाल
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; किराणा दुकानात दारू विकण्यास परवानगी
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा किरीट सोमय्यांच्या रडारवर; म्हणाले, ‘लवकरच..’
पहाटे ३ ला उठून योगा, उकडलेले अन्न; ‘अशी’ आहे १२६ वर्षे वय असलेल्या बाबा शिवानंद यांची दिनचर्या