महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीचे 25आमदार आपल्या संपर्कात आहेत, असं ते म्हणाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस आणि धुळवड काल साजरी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करत, महाविकास आघाडीचे आमदार संपर्कात असल्याचं सांगितलं. म्हणाले, आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते सावरले. निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील.
त्यांना भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या या 25 आमदारांची नावं विचारले असता त्यांनी सांगितले की, जे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्या आमदारांची नावं सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणणार नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचा भगवा रंग भेसळीचा आहे, अशी टीका केली होती त्यावर रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या दिवशी त्यांनी आम्हाला सोडलं आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेंव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. त्यांनी आता हिरवं पांघरून घेतलंय, आता हिरव्याचं समर्थन करतात.
शिवसेना सध्या राहिलेली इज्जत वाचवण्यासाठी भगवा-भगवा करतात. भेसळ आमच्यात आहे का त्यांच्यात त्यांनी पाहावं. भेसळ दोन-तीन एकत्र आले की भेसळ होत असते. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही, ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झाली आहे. असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली. म्हणाले, दाऊद इब्राहिमसारख्या बॉम्ब स्फोटातील आरोपीच्या पाठीमागे उभा राहणारा, त्याच्याशी फायनांशियल डिलिंग करणारा मंत्री जेलमध्ये गेला. तरीही त्यांचा राजीनामा न घेणाऱ्या आघाडीची अरेरावी राज्यातील जनतेला सहन होणार नाही.