पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पुण्यातील उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली आहे. उरुळी कांचन येथील मूळ निवासी असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय मुलाचा एका तरुणीसह पाच जणांनी खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव गिरीधर उत्रेश्वर गायकवाड असे असून तो गोपाळपट्टी, पार्क साई टॉवर मांजरी ता. हवेली, मूळ उरुळी कांचन येथील आहे. त्याचे वडील उत्रेश्वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेलर म्हणुन काम पाहतात.
हा प्रकार हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे मंगळवारी संध्याकाळी साडेदहा ते पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. मृत तरुणाचा भाऊ निखिलकुमार उत्रेश्वर गायकवाड याने हडपसर पोलिसात यासंदर्भात तक्रार दिली होती. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घडलेली घटना सविस्तर म्हणजे, मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गिरीधर घरी बसला होता. त्यावेळी त्याला एका मुलीचा फोन आला होता. फोननंतर तो घराबाहेर पडत असताना भाऊ निखीलकुमार याने कुठे चालला विचारले. यावर गिरीधर याने आपली मैत्रीण साक्षी पांचाळ हिचा फोन आला होता. मी तिला अर्ध्या तासात भेटून येतो असे सांगून गिरीधर घराबाहेर पडला.
अर्धा तास होऊन गेला तरी ही गिरीधर घरी परत न आल्याने, त्याची आई व भाऊ काळजीत पडले. त्यानंतर मुलाचा खून झाल्याची त्यांना माहिती मिळाली. माहितीनुसार, गिरीधर ज्या महाविद्यालयात शिकत होता त्याच महाविद्यालयात एक तरुणी देखील आहे. ही तरुणी विवाहित आहे. दरम्यान, गिरीधरसोबत बोललेले तिच्या पतीला पटत नव्हते.
याच वादातून मंगळवारी रात्री तरुणीने मुलाला फोन केला आणि गिरीधरला ग्लायडिंग सेंटर येथे बोलावले. त्या ठिकाणी तिचा पती देखील आला. त्याने आणि आणखी काहींनी चाकूने वार करून त्याचा खून केला अशी माहिती मिळत आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील घटनेचा तपास करत आहेत.