Share

महिंद्रा फायनान्सच्या अधिकाऱ्यांनी गरोदर महिलेला चिरडल्यानंतर आनंद महिंद्रांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

झारखंडमधील(Jharkhand) हजारीबागमध्ये महिंद्रा फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने शेतकऱ्याच्या मुलीची अलानियाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ट्रॅक्टरच्या कर्जावरील व्याजाचे दहा हजार रुपये न दिल्याने एजंटने गरोदर महिलेची चिरडून हत्या केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीची कोंडी होऊ लागली असतानाच आता महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा आणि सीईओ अनिश शहा पुढे आले आहेत. दोघांनी पीडितेच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. ही घटना अस्वस्थ करणारी असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

वसुलीदरम्यान थर्ड पार्टीच्या वर्तनाचेही मूल्यमापन केले जाईल, असे ते म्हणाले. ही घटना 15 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. हजारीबाग(HajariBag) येथील हायवे शेजारी राहणारे मिथिलेश मेहता यांनी महिंद्रा फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. लॉकडाऊन(Lockdown) दरम्यान, कंपनीचा कलेक्शन एजंट वसुलीसाठी आला नाही, त्यामुळे ते या कालावधीत कंपनीचे हप्ते भरू शकले नाही. लॉकडाऊन उघडल्यानंतर, जेव्हा ते हप्ते जमा करण्यासाठी पोहोचले तेव्हा कंपनीने त्यांच्या खात्यात व्याजाच्या नावावर मोठी रक्कम जमा केली. नंतर प्रकरण मिटल्यानंतरही दहा हजार रुपयांची तफावत होती.

तेच दहा हजार रुपये न दिल्याने 15 सप्टेंबर रोजी कंपनीच्या रिकव्हरी एजंटने(Recovery Agent) त्यांचा ट्रॅक्टर उचलला, तर त्यांच्या गरोदर मुलीने अधिकाऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, रिकव्हरी एजंटने तिला चिरडले जाईल, असे सांगून ट्रॅक्टर तिच्या अंगावर चढवला. आता महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दु:खद घडीमध्ये आपण त्यांच्यासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी कुटुंबियांना दिली.

या घटनेबाबत हजारीबागसह परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोन जीवांची किंमत फक्त दहा हजार रुपये आहे का, असा सवाल खुद्द मिथिलेशने(Mithilesh Mehta) उपस्थित केला आहे. शेवटी एवढ्या रकमेसाठी कंपनीच्या लोकांनी आपल्या मुलीला आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाला कसे मारले? त्यांच्या डोळ्यांसमोर एजंटने त्यांच्या मुलीवर दोनदा ट्रॅक्टर चालवल्याचे सांगितले. घटनेच्या वेळी त्यांची मुलगी दोन महिन्यांची गरोदर होती.

झारखंड किसान महासभेने या घटनेबाबत कंपनीविरोधात आवाज उठवला आहे. महासभेचे अध्यक्ष पंकज रॉय(Pankaj Roy) म्हणाले की, खाजगी बँका सोप्या पद्धतीचा हवाला देऊन भोळ्या शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर वसुलीच्या नावाखाली दररोज त्रास देतात. कर्ज काढले की शेतकऱ्यांना मरण्याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच वसुली एजंटच्या गैरव्यवहाराबाबतही त्यांनी सवाल केला. त्यांना धमकीचे फोन येत असल्याचे सांगितले. ताज्या प्रकरणातच शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नसेल तर त्याच्या ट्रॅक्टरचा लिलाव करावा, शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबाला चिरडून ठार करू नये, असे ते म्हणाले.

मिथिलेश मेहता यांनी सांगितले की, कोविड कालावधीपूर्वी त्यांनी शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी केला होता. त्यासाठी त्यांना सरकारी बँकेतून कर्ज घ्यायचे होते, मात्र महिंद्रा फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांना सुलभ प्रक्रिया करण्याचे आश्वासन देत कर्ज देऊन ट्रॅक्टर खरेदी करून घेतले. नवीन ट्रॅक्टर घेण्यापूर्वी त्यांनी जुना ट्रॅक्टरचं जमा केला नाही तर काही आगाऊ रक्कमही जमा केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उर्वरित रक्कम 14, 300 च्या 44 हप्त्यांमध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण दुसर्‍या लॉकडाऊनमध्ये ते सहा महिने हप्ते म्हणून 86,800 रुपये जमा करू शकले नाही. त्यांनी सांगितले की लॉकडाऊन उघडल्यानंतर जेव्हा ते बँकेत पोहोचले तेव्हा असे आढळले की त्यांच्या खात्यात व्याज म्हणून 33,200 रुपये जमा झाले आहेत.

मिथिलेशने यांनी सांगितले की त्यांची मुलगी शिकलेली होती आणि तिला तिचे हक्क माहित होते. रिकव्हरी एजंटने ट्रॅक्टर उचलण्यास सुरुवात केल्यावर त्यांच्या मुलीने विरोध केला. ट्रॅक्टर जप्त करण्यासंदर्भातील कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. यावरून वसुली एजंट इतके संतप्त झाले की त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘सीझरने लिस्ट मागतेस, थांब तुला मी गाडीने चिरडून दाखवतो’, असे सांगितल्यानंतर आरोपीने ट्रॅक्टर चालवला. त्यानंतर त्यांची मुलगी जिवंत असल्याचे पाहून पुन्हा तिच्यावर ट्रॅक्टर चढवून तो ट्रॅक्टर टाकून पळ काढला. हजारीबागचे एसपी मनोज रतन चोथे यांनी सांगितले की, गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

 

 

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now