सध्या अनेक लोकांना टॅटू गोंदवून घेण्याचे वेड लागले आहे. फॅशन म्हणून शरीराच्या विविध भागावर टॅटू गोंदवून घेतला जातो. याच टॅटूसंदर्भात उत्तर प्रदेशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टॅटू गोंदवून घेणं १४ जणांना महागात पडलं आहे.
उत्तर प्रदेश मधील वाराणसीमध्ये १४ जणांचा टॅटूसाठी वापरण्यात आलेल्या सुईमुळे जीव धोक्यात आला आहे. १४ जणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला आहे. त्यांची टायफॉइड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली आहे.
पण, तपासणीत काहीच निष्पन्न झाले नाही. उलट त्या १४ जणांचा ताप कमी होत नव्हता. त्यानंतर त्यांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. या चाचणीमधून त्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झालं आहे. यामुळे या १४ जणांना धक्का बसला.
यासंदर्भात १४ जाणांची विचारपूस करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांनी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवला नव्हता. या १४ जणांनी ज्या टॅटू आर्टिस्टकडून टॅटू गोंदवला त्या आर्टिस्टनं पैसे वाचण्यासाठी एकाच सुईचा वापर केला होता, असं नंतर लक्षात आलं.
त्यामुळे आता या घटनेनं टॅटू गोंदवणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. जर एखाद्या एचआयव्हीग्रस्ताने टॅटू गोंदवून घेतला आणि त्याला वापरण्यात आलेली सुई ही इतरांना वापरली तर त्या सर्व लोकांना एड्स होऊ शकतो, हे पुढं आलं.
त्यामुळे टॅटू काढण्यापूर्वी टॅटू आर्टिस्ट हा नव्या सुईचा वापर करत आहे की नाही? याची खात्री करुन घेणं आवश्यक आहे. तसेच काळजी म्हणून टॅटू गोंदवून घेतल्यानंतर कमीत कमी चार ते पाच तास तो टॅटू कापसाने कव्हर करायला हवा, असे डॉक्टर सांगतात.