हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट बनले आहेत, ज्यांना आयकॉनिक म्हटले जाते. म्हणजेच क्वचितच कुठला निर्माता त्या चित्रपटांचा रिमेक रसिकांसमोर मांडू शकेल. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित असाच एक आयकॉनिक चित्रपट ‘देवदास’ चित्रपटगृहात आजपासून बरोबर २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटातील शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित या त्रिकुटाने आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते.
या चित्रपटात या कलाकारांचा अभिनय तर होताच, पण कलाकारांच्या भव्य सेट आणि वेशभूषेनेही रसिकांना वेड लावले होते. आज म्हणजेच १२ जुलैला चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्षे झाली आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला चित्रपटाशी निगडीत रंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्यात सेटवर पाण्यासारखा पैसा वाहून जाण्यापासून ते निर्मात्याला तुरुंगात जाण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, ‘देवदास’ बंगाली कादंबरीकार सरचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे, ज्यामध्ये संजय लीला भन्साळींनी त्यांच्या अनुभवाची भर घातली आहे. त्यामुळे ‘देवदास’चे बजेट ५० कोटींवर पोहोचले होते. असा दावा केला जातो की या चित्रपटाच्या शूटिंगसाठी एका दिवसाचा खर्च सात लाख रुपये यायचा, जो त्या काळात खूप जास्त होता.
संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सहा वेगवेगळे सेट तयार करण्यात आले होते, ज्यामध्ये २५०० दिवे, ७०० लाइट मेन, ४२ जनरेटर आणि ३ मिलियन वॅटचा वीजपुरवठा वापरण्यात आला होता. साधारणपणे २ ते ३ जनरेटर एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरला जातो. या चित्रपटाचा प्रत्येक सेट इतका आलिशान होता की पाहणाऱ्याचेही डोळे दिपून जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चित्रपटात चंद्रमुखीची (माधुरी दीक्षित) खोली १२ कोटींमध्ये बांधली गेली, तर पारोचा (ऐश्वर्या राय) पॅलेस तीन कोटींमध्ये पूर्ण झाला.
आज म्हणजेच २० वर्षांनंतरही जेव्हा देवदास पाहिला जातो तेव्हा एक गोष्ट सगळ्यांना जाणवते ती म्हणजे संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटातील प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीकडे लक्ष दिले आहे. या चित्रपटाचा सेट जसा भव्य होता, त्याचप्रमाणे स्टारकास्टचा पेहरावही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटात माधुरी दीक्षितने प्रसिद्ध डिझायनर संदीप घोसला यांनी तयार केलेल्या ‘काहे छेड़ छेड़ मोहे’मध्ये ३० किलोचा हिरवा लेहेंगा परिधान केला होता. मात्र, नंतर हा लेहेंगा १६ किलोमध्ये तयार करण्यात आला.
या चित्रपटात पारो बनलेल्या ऐश्वर्या रायनेही एकापेक्षा एक सुंदर साडी नेसली होती. भन्साळींना चित्रपटात ऐश्वर्याला परफेक्ट लूक द्यायचा होता आणि त्यासाठी त्यांनी ऐश्वर्याच्या वेशभूषेची जबाबदारी नीता लुल्लाला दिली. नीला लुल्ला यांनी उत्तमोत्तम साडी खरेदी करण्यासाठी कोलकात्याच्या अनेक ट्रीप केल्या होत्या. पण संजय लीला भन्साळी यांनीही ऐश्वर्यासाठी कोलकाता ते मुंबईत जवळपास ६०० साड्या आणल्या.
हा चित्रपट आयकॉनिक बनवण्यासाठी संजय लीला भन्साळी यांनी आंधळेपणाने पैसे खर्च केल्याचे आतापर्यंतच्या माहितीवरून समजले आहे. पण चित्रपटाच्या इतक्या मोठ्या बजेटने निर्मात्याला अडचणीत टाकले. चित्रपटाचे निर्माते भरत शाह यांच्यावर आरोप होता की, अंडरवर्ल्डकडून चित्रपटावर पैसा लावला जात होता आणि त्यामुळे त्यांना तुरुंगातही राहावे लागले होते. भरत जवळपास १६ महिने तुरुंगात होता, त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक लागला होता. पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चित्रपटावर काम सुरू झाले आणि २००२ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये आला.
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला होता. ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १०४ कोटींची बंपर कमाई केली. इतकंच नाही तर पुढील चार वर्षात ‘देवदास’च्या कमाईशी कोणताही चित्रपट टक्कर देऊ शकला नाही. अनेक पुरस्कारही या चित्रपटाच्या झोळीत आले. ‘देवदास’ने ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि ११ फिल्मफेअर पुरस्कार ते १६ आयफा पुरस्कार जिंकले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
सलमानने कंगनाला संजय लीला भन्साळींकडे पाठवले तेव्हा ते म्हणाले, तु गिरगिट आहेस, रंग बदलतेस
लग्नाच्या आधीच रणबीर आलियाच्या या सवयीला वैतागला, संजय लीला भन्साळींकडे केली तक्रार
पद्मावतमध्ये सलमानला खलनायक म्हणून पाहायचे आहे ऐश्वर्याच्या या अटीवर भन्साळी म्हणाले..
हॉटेलमध्ये काम करणारा केके कसा बनला तरूणाईला भुरळ पाडणारा गायक? वाचा जीवनप्रवास