महाराष्ट्र राजकारणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) विषयी सतत ऐकायला मिळते. ईडीने आज या नेत्याच्या, अधिकाऱ्याच्या घरी छापा मारला आणि एवढी रक्कम मिळाली हे ऐकायला मिळते. आता ईडीचा हा परिणाम छोट्या गावांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. एका खेडे गावात मनसे च्या कार्यकर्त्यांनी चक्क पोस्टर बाजी करत ईडीला गावातील भ्रष्टाचार संबंधी चौकशी करण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.
बीडच्या नांदुरघाट परिसरामध्ये तिथल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी ही थेट ईडीने करावी असे बॅनर्स मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी लावले आहेत. सध्या त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या पोस्टर मुळे राजकीय वर्तुळात कोणी ईडी ची खिल्ली उडवत आहे, तर कोणी या घटनेला सकारात्मक घेत आहे.
पोस्टर वरती लिहिले आहे की, ED/ ईडीने थोडं लक्ष आमच्या नांदूरघाट सर्कल मध्ये पण घालावं. मोठे माशे जाळ्यात अडकत आहेत पण लहान माशे पण करोडोंचा भ्रष्टाचार करून माला-माल झाले आहेत. तसेच पुढे लिहिले की, नांदूरघाट गावा अंतर्गत 600 मीटर रस्त्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करून काम चालू आहे ते पण प्रचंड प्रमाणात बोगस आहे.
नांदूरघाट सर्कल मध्ये मागच्या 5 वर्षात 100 करोड़ पेक्षा जास्त रुपयांची कामे झाली, पण प्रत्यक्षात मात्र कुठे कामे दिसत नाहीत. पाणी पुरवठा योजनेसाठी 2 ते 3 कोटी रूपये खर्च करून पण नांदूरघाट गावाला पाणी विकत घ्यावे लागते. नांदूरघाट जिल्हा परिषद सदस्य यांचा असा कोणता व्यवसाय आहे की त्यातून 2 करोड रुपयाचे घर व कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे का भ्रष्टाचाराचा पैसा आहे.
ईडी ने नांदूरघाट सर्कल मध्ये झालेल्या कामांची पण चौकशी करावी कारण पैसा शासनाचा आहे. करोडो रूपये खर्च करून पण कोसो दूर विकास सापडत नाही. नांदूरघाट मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचारा वर आवाज उठवावा अश्या विनंती चे पत्र किरीट सोमय्या यांना पाठवणार करोडो रुपयांचा विकास कुठे हरवला याची चौकशी करावी.
हे बॅनर्स नांदूरघाट सोबतच शिरूर, नाहोली, सांगवी या गावांमध्ये दर्शनीय भागात लावले असून, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी हे बॅनर्स लावले आहेत. नांदुरघाटमधील विकास काम करताना कोट्यवधी रुपयांची अनियमितता यावरून सुमंत धस यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण केले होते. अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे मान्य करूनही त्याचा उपयोग झाला नसल्याने त्यांनी आता या कामांची चौकशी ईडीने करावी अशी मागणी केली आहे.