महाराष्ट्रात कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीये. सर्वसामान्यांसोबतच महाराष्ट्र सरकारचे मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राज्यातील १० मंत्री कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत.
पवार म्हणाले, ‘मंत्र्यांव्यतिरिक्त राज्यातील २० हून अधिक आमदारही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात अशाच प्रकारे कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास राज्य सरकार राज्यात आणखी निर्बंध लादू शकते, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर यांच्यासह एकूण १० मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
यापूर्वी, शुक्रवारी महाराष्ट्रात कोविड-१९ चे ८,०६७ नवीन रुग्ण आढळून आले होते, जे आदल्या दिवसाच्या तुलनेत सुमारे ५० टक्क्यांनी अधिक आहे. तसेच, गेल्या २४ तासांत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की नवीन प्रकरणांमध्ये चार ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांचा समावेश आहे.
गुरुवारी राज्यात एकूण ५,३६८ रुग्ण आढळले. विभागाने सांगितले की, शुक्रवारी कोरोना विषाणूचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या चार प्रकरणांची पुष्टी झाली आहे. या चार प्रकरणांमध्ये वसई-विरार, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी एक रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.