Share

Eknath shinde : एकनाथ शिंदेंची सही वापरून लावला 1 कोटींचा चुना, पालघरमधील दुकानदारासोबत घडला विचित्र प्रकार

पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सह्या असलेल्या सरकारी व्यवहाराच्या पेमेंट स्लिप दाखवून पालघरमधील एका व्यक्तीची १.३१ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच ते तत्काळ सक्रिय झाले. या फसवणुकीप्रकरणी दोन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वसई तालुक्यातील नालासोपारा येथील रहिवासी जतीन पवार आणि शुभम वर्मा यांच्या विरोधात स्टेशनरी दुकानाचे मालक ५० वर्षीय जिग्नेश गोपानी यांची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्टेशनरी दुकानाच्या मालकाला सांगितले की, त्यांना राज्य सरकारचे ई-पोर्टल फ्रँचायझी उघडायचे आहे. त्यांनी दुकान मालक गोपानीला यात भागीदारीची ऑफर दिली. सोबत एक लाख रुपये मागितले.

मात्र, गोपानीने भागीदारीसाठी नकार दिला. त्यानंतर दोघा आरोपींनी अनेकवेळा दुकान मालक गोपानीला पैसे मागितले, आणि काम सुरू असल्याचं सांगितले. असे पैसे मागत मागत दोघांनी गोपानीकडून एकूण १,३१,७५,१०४ रुपये घेतले.

पोलिसांनी सांगितले की, २५ ऑगस्ट रोजी आरोपींनी गोपानी यांना ई-पोर्टल फ्रँचायझीसाठी परवाना, परमिट आणि इतर फी भरण्याची स्लिप दिली होती. त्या स्लिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आणि इंग्रजीत स्वाक्षरी होती. स्लिपवर मुख्यमंत्र्यांची सही पाहून संशय आल्याने गोपानी यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

यानंतर शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्यातील एका आरोपीला अटक करण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी अदार पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now