ना कोचिंग क्लासेस, ना कोणाचे मार्गदर्शन तरीही सीएच्या परीक्षेत मुंबईची झरीन देशात पहिली

 

मुलगी २०-२२ वर्षाची झाली की अनेकदा तिला कुटुंबाचे सदस्य स्थळ बघायला सुरुवात करतात. त्यावेळी अनेकदा मुलींना शिक्षणाची ओढ असली, तरी तिला लग्नासाठी होकार द्यावा लागतो. पण मुलीच्या शिक्षणासाठी जर कुटुंबाने पाठिंबा दिला तर मुली कोणत्याही क्षेत्रात आपले नाव मोठे करु शकतात, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मुंबईत राहणाऱ्या झरीन खानने सीए (आयपीसीसी) ही देशातील अत्यंत कठिण असणाऱ्या परिक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे नोकरी करत, कोणताही क्लास न लावता ती देशात पहिली आली आहे. त्यामुळे सर्वांकडून तिचे कौतुक केले जात आहे.

मुस्लिम समाजात अनेकदा मुलींचे लग्न लहान वयात लावले जाते. ही अडचण झरीन समोरही उभी राहिली. तिच्या शिक्षणात लग्नाचे विघ्न आले होते. बारावी झाल्यानंतर तिचे नातेवाईक, शेजारचे लोक तिचे लग्न लाऊन देण्यासाठी कुटुंबियांवर दबाव टाकत होते.

त्यामुळे तिच्या आई वडिलांची इच्छा होती कि तिने लग्न करुन घ्यावे. पण मला सीए व्हायचे आहे, इतक्या लवकर मला लग्न करायचे नाहीये, असे झरीनने घरच्यांना सांगितले. तिच्या घरच्यांना झरीन अभ्यासात हुशार आहे हे माहित होते. त्यामुळे तिच्या कुटुंबाने तिला एक संधी देत तिचा निर्णय मान्य केला.

झरीनची परिस्थिती गरिबीचीच आहे. तिचे वडिल गॅरेजमध्ये मेकॅनिक आहे. तर तिची आई गृहिणी आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तिला मोठमोठे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने नोकरी करण्यास सुरुवात केली आणि मिळालेल्या पैशातून तिने स्मार्टफोन विकत घेतला.

त्या स्मार्टफोनमुळे तिला ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य झाले होते. त्या माध्यमातून अभ्यास करुन ती देशात पहिली आली आहे. परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही ती नोकरी करणार आहे. देशात पहिली आल्याने तिला चांगल्या पगाराच्या नोकरीची अपेक्षा आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.