Share

Yuvraj Singh : युवराज सिंग अन् विंडीजच्या खेळाडूचा भर मैदानात राडा, एकमेकांच्या अंगावर गेले धावून; अखेर ब्रायन लारा आला अन्…

Yuvraj Singh : भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या काळात त्याचा मैदानातील आक्रमक स्वभाव अनेकदा पाहायला मिळाला आहे. निवृत्तीनंतरही त्याच्या या स्वभावात फारसा बदल झालेला नाही, याचा प्रत्यय आंतरराष्ट्रीय मास्टर्स टी-20 लीगच्या अंतिम सामन्यात आला. भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंग आणि वेस्ट इंडिज मास्टर्सचा वेगवान गोलंदाज टिनो बेस्ट यांच्यात या सामन्यात जोरदार शाब्दिक वाद रंगला.

मैदानात तापलेले वातावरण, ब्रायन लाराने केला हस्तक्षेप

भारत आणि वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यातील अंतिम सामन्यात भारतीय संघ सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र, 13 व्या षटकानंतर अचानक युवराज सिंग आणि टिनो बेस्ट यांच्यात जोरदार बाचाबाची सुरू झाली. दोघेही एकमेकांसमोर येऊन आक्रमक शैलीत बोलत होते. त्यांच्या या वादामुळे सामना काही वेळासाठी थांबवावा लागला. अखेर, वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा स्वतः पुढे आला आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. अन्य खेळाडूंनाही हस्तक्षेप करावा लागला, तेव्हा कुठे परिस्थिती निवळली.

भारताने 6 विकेट्सने जिंकला अंतिम सामना

युवराज सिंग आणि टिनो बेस्ट यांच्यातील वादाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, युवराजने संघाला विजय मिळवून देत या संघर्षाचा ‘बदला’ घेतला. ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत 148 धावा केल्या. त्यांच्यासाठी लेंडल सिमन्सने सर्वाधिक 57 धावा केल्या, तर भारताकडून वेगवान गोलंदाज आर. विनय कुमारने 3 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल, अंबाती रायुडूच्या तुफानी 74 धावांच्या खेळीच्या जोरावर इंडिया मास्टर्सने 18 व्या षटकात केवळ 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. भारताने हा सामना 6 विकेट्सने जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर केली. या विजयासह भारतीय संघाने मास्टर्स लीगमध्ये वर्चस्व गाजवले.

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now