काय सांगता! यूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, बहीण-भावाला अटक

पिंपरी चिंचवड । आजकाल मोबाईलवर बघून अनेक गोष्टी आपल्याला घरीच करता येऊ लागल्या आहेत. अगदी कोणतीही गोष्ट आपण यूट्यूबवर बघून शिकू शकतो. मात्र याचा काहीजण गैरवापर देखील करतात.

यातच आता यूट्यूबवर व्हिडीओ पाहून चक्क घरच्या घरी खोट्या नोटा छापल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बहीण-भावाला अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधील भाजी मंडईमध्ये खोट्या नोटा खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडगोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी सुनीता रॉय आणि दत्ता प्रदीप रॉय या भावंडांना अटक करण्यात आली आहे. छापलेल्या खोट्या नोटा खपवण्यासाठी ते स्थानिक मार्केटमध्ये प्रयत्न करत होते. अशी माहिती देखील समोर आली आहे.

भोसरी येथील भाजी मंडईमध्ये या खोट्या नोटा खपवण्याचा प्रयत्न करताना हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून शंभर रुपयाच्या 34 नोटा जप्त केल्या आहेत.

हे दोन आरोपी यूट्युबवर व्हिडीओ पाहून घरातच खोट्या नोटा तयार करत होते. त्यासाठी त्यांनी प्रिंटर आणि कागद घेतले होते. शंभर रुपयांच्या बनावट नोटा हे दोघे छापत होते.

दोघांनी भाजी खरेदी करुन या नकली नोटा भाजी विक्रेत्याला दिल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सुनीता आणि दत्ता यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून दोन प्रिंटर, कागदी रिम आणि सुट्टे कागद असा एकूण 34 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अजून कोणाचा यामध्ये सहभाग आहे का याची चौकशी करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.