“डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे पुरावे तुमच्याच सरकारने नष्ट करण्याचा प्रयत्न केला”

मुंबई । अनेक घडामोडींनंतर सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला होता.

यावरून आता जोरदार राजकीय वातावरण पेटले आहे. भाजपकडून पवारांना सणसणीत प्रत्युत्तर आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत 2014 मध्ये सुरू करण्यात आली आहे.

मात्र अद्याप सीबीआय त्यात कुठल्याही ठोस निष्कर्षाप्रत येऊ शकलेली नाही. त्यामुळे या चौकशी प्रक्रियेप्रमाणे सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासकार्याची परिणती होऊ नये, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

यावर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ज्यावेळी दाभोळकरांना मारले तेव्हा राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार होते आणि गृहमंत्रीही तुमच्याच पक्षाचा होता.

तुमच्या सरकारने तब्बल 14 महिने या प्रकरणाशी निगडीत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला, हे विसरू नका, असे म्हणत भातखळकरांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

आता अतुल भातखळकरांनी दिलेलल्या प्रत्युत्तरावर महाविकास आघाडीकडून काय उत्तर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकरणी आज सीबीआयचे केंद्रीय पथक मुंबईत दाखल होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.