Solapur News : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळले आहेत. मोहोळ (Mohol) तालुक्यातील युवा शेतकरी लखन माने (Lakhan Mane) यांनी आपल्या शेतात पाण्यात बसून थेट राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना एक आर्त विनंती केली आहे. “आम्हाला पंचनामा नको, नुकसानभरपाई नको, फक्त हमीभाव द्या,” असा सच्चा आणि थेट संदेश त्यांनी दिला आहे.
टोमॅटो पिकावर पावसाचा घाला, लाखोंचं नुकसान
६ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली. लखन माने यांच्या दोन एकर क्षेत्रातील टोमॅटो पीक संपूर्णपणे जलमय झालं असून, त्यांना १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान होण्याची भीती आहे.
पाण्याने पोखरलेली शेतजमीन आणि हातातोंडाशी आलेलं उत्पादन वाया जात असल्यामुळे लखन माने हतबल झाले. त्यांनी शासन आणि कृषी खात्याकडे आपल्या व्यथा थेट व्यक्त करत हमीभाव देण्याची मागणी केली आहे.
लखन माने यांची टीका
आपल्या भावनिक निवेदनात लखन माने यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळावरही टीका केली. “कोणी रम्मी खेळतोय, कोणी एकमेकांना मारतोय, कोणी बार उघडतोय, पण आमच्या शेतीची कोणालाच चिंता नाही,” अशा शब्दांत त्यांनी राजकारण्यांवर नाराजी व्यक्त केली.
त्यांनी हेही सांगितलं की, सत्ताधारी आणि विरोधक केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले असून, खऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. “पंचनामे नकोत, नुकसानभरपाई नको, हमीभाव द्या,” हीच आमची शेतकरी म्हणून मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पावसाने सोलापूर जिल्ह्यात कहर
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं. सरासरी ७२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाळे (Bale) परिसरातील संतोषनगर आणि तोडकर वस्ती भागातील सुमारे ८० घरे पाण्याखाली गेली. घरात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबांना घराबाहेर स्थलांतर करावं लागलं.
लखन माने यांच्यासारख्या शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता, केवळ पंचनामे करून शेतकऱ्यांना कागदोपत्री दिलासा देण्याऐवजी त्यांना त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी ठोस योजना लागू करण्याची गरज आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आणि कृषी खात्याने तातडीने निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.