Woman Dies of Heart attack in Gym : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : अजून आयुष्याची खरी सुरुवातसुद्धा झाली नव्हती, घरची लाडकी मुलगी, भावाची जिवलग मैत्रीण आणि पालकांचा आधार असलेली 20 वर्षीय प्रियंका खरात (Priyanka Kharat) अचानक गेल्याने खरात कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. गुरुवारी सायंकाळी बीड बायपास (Beed Bypass) परिसरातील जिममध्ये व्यायाम करताना प्रियंकाला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.
अचानक घडलेला धक्कादायक प्रकार
प्रियंका अनिल खरात (Priyanka Anil Kharat) हिचं वय अवघं 20 होतं. तिनं बीफार्मसीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. खरात कुटुंब बीड बायपास परिसरातील मस्के पेट्रोल पंपाजवळील अपार्टमेंटमध्ये राहतं. वडील अनिल खरात (Anil Kharat) हे देवगाव रंगारी (Devgaon Rangari) येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबात प्रियंका आणि तिचा धाकटा भाऊ यश (Yash) अशी दोनच लेकरं होती.
वडिलांना चहा करून निघाली जिमला
घटनेच्या दिवशी आई बाहेर गेल्यामुळे प्रियंकाने घरातील काम आटोपून वडिलांना चहा करून दिला आणि “मी जिमला जाते” असं सांगून घरातून बाहेर पडली. गेल्या महिन्याभरापासून ती जिमला जात होती. त्या दिवशी तिच्यासोबत भाऊ यश आणि मैत्रीण प्रणाली कुलकर्णी (Pranali Kulkarni) देखील होती.
जिममधील शेवटची क्षणं
संध्याकाळी तिघे जण हसत-खेळत जिममध्ये पोहोचले. प्रियंकाने उत्साहाने व्यायाम सुरू केला. भाऊ आपला सेट पूर्ण करेपर्यंत ती थांबली होती. तेवढ्यात तिला अचानक चक्कर आली आणि ती थेट जमिनीवर पडली. तात्काळ तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण काही वेळातच तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचं प्राणांतिक निधन झालं.
प्रियंका आणि भाऊ यश यांच्यात फक्त भावंडांचं नातं नव्हतं तर गाढ मैत्री होती. दोघंही नेहमी सोबत असत. बाहेर जाणं असो किंवा फेरफटका मारणं, जिम करायचं असो की घरकाम – यशच्या सावलीसारखी बहीण कायम त्याच्यासोबत असे. अचानक बहिणीचं असं जाणं त्याला असह्य झालं आहे. अंत्यसंस्कारावेळी यशचा डोळे पुसता न पुसता रडण्याचा आवाज ऐकून सर्वांचं मन हेलावून गेलं.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
एकुलती एक मुलगी गमावल्याने खरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी या धक्क्यावेळी कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रियंकाच्या जाण्याने झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही हे साऱ्यांनाच प्रकर्षाने जाणवत होतं.