Woman Delivers Baby On Railway Station: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशी (Jhansi) रेल्वे स्थानकावर एक धडकी भरवणारी घटना घडली. एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्यामुळे तिला फलाटावरच बाळाला जन्म द्यावा लागला. विशेष बाब म्हणजे, त्या ठिकाणी असलेल्या लष्कराच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने कमीतकमी साधनांमध्ये ही प्रसूती यशस्वी केली. या डॉक्टरचे नाव मेजर डॉ. रोहित बचवाला (Major Dr. Rohit Bachwala) असे आहे.
डॉक्टर झाले देवदूत
शनिवारी दुपारी पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस (Panvel-Gorakhpur Express) मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला अचानक प्रसूतीचे त्रास सुरू झाले. झाशी रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलेल्या या महिलेला फलाटावरच प्रसूत करावे लागले.
तिकिट तपासणीसाठी हजर असलेल्या महिला रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि तिथेच उपस्थित असलेल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थितीची गंभीरता ओळखून उपाययोजना सुरु केली. त्या वेळी फलाटावर उभे असलेले मेजर डॉ. रोहित बचवाला (Major Dr. Rohit Bachwala) यांनी पुढाकार घेतला आणि महिलेला बाळंत करण्याचा निर्णय घेतला.
ऑपरेशन थिएटर नव्हते, पण संयम आणि कौशल्य भरपूर
डॉ. बचवाला यांनी सांगितले की, “फलाटावर ऑपरेशन थिएटर तर दूरचीच गोष्ट होती. माझ्याकडे जे काही सामान होतं, त्यातूनच उपाय शोधावा लागला. महिलेला प्रसव अत्यंत क्लिष्ट होता आणि प्रत्येक क्षण महत्वाचा होता.”
त्यांनी केसांची क्लिप (Hair Clip) वापरून बाळाची नाळ दाबली आणि पॉकेटमधील छोट्या चाकूने (Pocket Knife) ती कापली. या दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्पुरती संरक्षक जागा निर्माण करून डॉ. बचवालांना मदत केली. काही वेळातच बाळ सुरक्षित जन्माला आलं.
आई आणि बाळ दोघंही ठणठणीत
प्रसूतीनंतर बाळ आणि आई दोघांनाही त्वरित रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात (Local Hospital) दाखल करण्यात आलं. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
कर्तव्यपूर्ती करून पुढील प्रवासासाठी निघाले
विशेष बाब म्हणजे, ही धावपळ, जबाबदारी आणि उपचार सर्व यशस्वी पार पडल्यानंतर मेजर डॉ. रोहित बचवाला (Major Dr. Rohit Bachwala) हे स्वतः नियोजित ट्रेनने हैदराबाद (Hyderabad ) कडे रवाना झाले.
प्रवाशांकडून कौतुकाचा वर्षाव
या संपूर्ण घटनेनंतर रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. बचवाला यांच्या प्रसंगावधान आणि वैद्यकीय कौशल्याचे भरभरून कौतुक केले. एका लष्करी अधिकाऱ्याने संकटसमयी देवदूतासारखी भूमिका पार पाडल्याचं म्हणत सर्वत्र त्यांच्या कार्याचे स्तुतीसुमन उधळले जात आहेत.