दत्ताकाकाच्या जाण्याने राष्ट्रवादीने महत्वाचा शिलेदार गमावला – जयंत पाटील

 

पिंपरी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे धडाकेबाज नगरसेवक दत्ताकाका साने यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांना हे जग सोडून निघून जावे लागले आहे.

त्यांच्या अकाली मृत्यूने राष्ट्रवादीत सन्नाटा पसरला आहे. दत्ताकाकाच्या जाण्याने आम्ही महत्त्वाचा शिलेदार गमावला असल्याची भावना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करून दत्ताकाका साने यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या निधनाची बातमी नुकतीच समजली. दत्ताकाका साने यांच्या निधनाने राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाचा महत्त्वाचा शिलेदार गमावला आहे.

त्यांचा परिवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. दुसरीकडे सध्या कोरोनाने ग्रासलेले आणि रूग्णालयात उपचार सुरू असलेले भाजपचे आमदार महेश लांडगे यांनीही साने यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

“धक्कादायक.. माझे सहकारी-मित्र-मार्गदर्शक दत्ताकाका साने यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, असे ट्विट लांडगे यांनी केले आहे. २५ जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.

त्यांच्यावर चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. साने यांच्या निधनामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.