Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) वादाला आता नवा कलाटणी मिळाली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अलीकडेच जोरदार हल्लाबोल केला होता. “हा विसरभोळा मंत्री अंधश्रद्धा बाळगतो, याला नेपाळ किंवा नागालँडमध्ये पाठवलं पाहिजे,” अशी टीका जरांगेंनी केली होती.
या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आता तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांनी विचारलं की, “नेपाळला कोणाला सोडायचं आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार जरांगे यांना कोणी दिला? महाराष्ट्रात फक्त तेवढेच राहणार का आणि इतरांना देशाबाहेर पाठवणार का?” असं त्यांनी उलटसुलट विचारलं. पुढे ते म्हणाले की, “समाजासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर अशी वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. भुजबळ साहेबांवरही आणि एकूण चळवळीतील कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने हल्ला करणे टाळले पाहिजे.”
भरत कराडच्या आत्महत्येबाबत सरकारवर टीका
लातूर जिल्ह्यातील वांगदरी (Wangdari, Latur) गावातील ३५ वर्षीय भरत महादेव कराड या तरुणाने ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारला थेट जबाबदार धरले.
ते म्हणाले, “भरत कराड हा ओबीसी चळवळीत सातत्याने सक्रिय होता. प्रत्येक सभा आणि मेळाव्यात त्याचा सहभाग असे. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याला जीवन संपवावं लागलं. हा निर्णय म्हणजे सरकारच्या निष्काळजीपणाचा बळी आहे. मी स्वतः पुढील दोन दिवसांत कुटुंबाला भेटणार आहे. त्यांना सरकारने आधार द्यायला हवा आणि आर्थिक मदतही पुरवली पाहिजे. याचबरोबर, त्या जीआरचा तातडीने पुनर्विचार केला गेला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.