धर्म कोणता, जात कोणती, त्याचा प्रांत कोणता हे बघून आरोपी ठरवणार का? भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई। साकीनाका येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. त्यामुळे महिलांवर अत्याचार थांबत नसल्याने महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांची नोंद ठेवणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच यासोबतच रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणावर चाप लावणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले आहेत. मात्र आता हाच मुद्दा तापण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे, असा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

अतुल भातखळकर फक्त आरोप केला नसून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात समता नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता परप्रांतियांचा मुद्दा चांगलाच तापणार आहे. या संदर्भात अतुल भातखळकर यांनी एक ट्विट देखील केलं आहे.

अतुल भातखळकर या पोस्टमध्ये म्हणाले की, सकिनाका बलात्कार प्रकरणानंतर दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दुपारी 12.30 वाजता समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जाणार आहे. त्यामुळे विरोधकांकडून आता जोरदार टीका केली जात आहे.

माता भगिनींची टिंगल टवाळी करणे आणि त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयात झालेल्या गृह विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत. व त्यानंतर आता भाजपकडून यावर टीका केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य १०० टक्के घटनेच्या विरोधी आहे. बलात्काराच्या चौकशीसंबंधी बैठक घेताना परप्रांतीय लोकांवर नजर ठेवावी लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात. बलात्कार करणाऱ्याच्या बाबतीत त्याचा धर्म कोणता, जात कोणती, त्याचा प्रांत कोणता हे बघून आरोपी ठरवणार का? असा सवाल भातखळकरांनी उपस्थित केला.

भातखळकर एवढ्यावरच थांबले नसून तुमच्या मांडीला मांडी लावून बलात्कारी मंत्री बसले आहेत. ते महाराष्ट्रीयन आहेत की परप्रांतीय? तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आरोप होतात. महिलेने आरोप केले की त्यांना तुरुंगात टाकले जाते, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.