Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेली शिवसेना (Shiv Sena UBT) आणि मनसे (MNS) युतीची शक्यता आता आणखी रंगतदार झाली आहे. मात्र, युतीचा अंतिम निर्णय पक्ष पातळीवर होईल, तोपर्यंत तुम्ही सगळ्या महापालिका जागांसाठी तयारी सुरू करा, असा स्पष्ट आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. त्याआधी संघटनात्मक तयारी भक्कम करण्यावर उद्धव ठाकरेंनी भर दिला.
महत्त्वाच्या महापालिकांवर भर
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर आणि वसई-विरार या सात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख आणि गटप्रमुखांसोबत सविस्तर बैठक घेतली.
जिथे गटप्रमुखांची नियुक्ती बाकी आहे, तिथे तातडीने नियुक्ती करा आणि संघटन मजबूत करा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच, नवीन प्रभाग रचनेनुसार होणाऱ्या निवडणुकांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही दिले.
युती झाली तर बहुमत नक्की
बैठकीनंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह अनेक महापालिकांमध्ये बहुमत मिळवणे शक्य आहे.
यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
युतीबाबत अजूनही गुलदस्ता
हिंदी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांनी एकत्र येत मेळावा घेतला. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर युतीच्या चर्चेला गती मिळाली. मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरेंनी म्हटलं, “२० वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग तुम्ही का भांडता?” हा संदेश राजकीय पातळीवर दूरवर गेला, पण युतीची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही.
उद्धव ठाकरे यांचा स्पष्ट संकेत असा आहे की, युतीची घोषणा कधीही होऊ शकते, पण तोपर्यंत संघटनात्मक तयारी आणि प्रत्येक जागेसाठी नियोजन सुरू असावे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या महापालिका राजकारणात मोठा बदल घडू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.