मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणार – विजय वडेट्टीवार

पुणे । सारथी संस्थेच्या संदर्भातील सर्व प्रश्न लवकरच सोडवण्यात येणार आहेत. याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल. असे मागास ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या तसेच रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात सारथीसाठी 50 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विजय वडेट्टीवार यांनी सारथी संस्थेच्या प्रश्नासंदर्भात आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, सामाजिक कार्यकर्ते अतुल लोंढे, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर उपस्थित होते.

सारथीचे अध्यक्ष निंबाळकर यांनी सारथीच्या अडचणीबाबत माहिती दिली. मंत्री वडेट्टीवार म्हणाले, केंद्रीय तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमध्ये यश मिळविण्यात मराठा तसेच कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी सारथीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.

कौशल्य विकास विषयक प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा. यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आवश्यक पदे भरण्यात यावीत तसेच महिलांना प्राधान्य देण्यासोबतच विद्यार्थ्यांना अधिकाधिक नोकऱ्यांच्या उपलब्धतेसाठी संस्थेने प्रयत्न करावेत. अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.