मुंबईत लोकल ट्रेन सुरू होणार का?; यावर राजेश टोपे म्हणाले…

 

मुंबई। राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे.

दरम्यान मुंबईत दूरच्या उपनगरांतून नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या नोकरदारांची सहनशक्ती बुधवारी सकाळी अखेर संपली आहे. नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल रोको आंदोलन केले आहे.

सरकार आता सामान्यांसाठी रेल्वे सुरू करणार का? असा प्रश्न विचारल्यावर “लोकांची मागणी रास्त आहे पण सोशल डिस्टन्सिंगचं काय”, असे म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थेट उत्तर द्यायचे टाळले आहे.

राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन करणार नाही. असे स्पष्ट करताना आरोग्य मंत्र्यांनी लोकलसेवा सुरू करण्याचा निर्णय सीएम घेतील, असे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चेंडू टोलावला आहे.

अनलॉक सुरू झाले, खासगी कार्यालये सुरू झाली, पण लोकल सेवा मात्र सामान्यांसाठी सुरू झाली नाही. त्यामुळे नालासोपाऱ्यात एसटीची वाट पाहून वैतागलेल्या नोकरदारांनी थेट रेल्वे रुळावर उतरून रेल रोको आंदोलन केले.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी आरोग्यमंत्री बोलत असताना या आंदोलनावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नालासोपारा वसई विरार मधून मोठ्या संख्येने लोक कामासाठी मुंबईत येत असतात. लोकल सेवा सुरू करावी, ही या लोकांची मागणी आहे, ती रास्त आहे.

पण लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही”, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. ट्रेन सुरू करण्यासंदर्भात सीएम निर्णय घेतील, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निर्णय ढकलला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.