Share

बिहारसारखा निर्णय महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या संदर्भात घेतला जाणार? राजकीय वर्तुळात चर्चा

शिवसेनेचे(Shivsena) जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामध्ये शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ८ आमदार आहेत. यामुळे शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Will a decision like Bihar be taken in the context of rebel MLAs in Maharashtra?)

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेने आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला १६ आमदार गैरहजर होते. यामुळे या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मागणीला विरोध दर्शवत पक्षादेश हा फक्त विधानसभेच्या कामकाजासाठी लागू होतो, असे सांगितले होते.

पण बिहारमधील जनता दलच्या दोन खासदारांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आले होते. बिहारमधील जनता दलच्या शरद यादव आणि अली अन्वर या दोन खासदारांवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कारवाई केली होती. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या दोन खासदारांना अपात्र ठरवले होते.

या दोन खासदारांनी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाचा विरोधात दाद मागितली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले होते. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांच्या पक्षाशी असलेली आघाडी तोडून भाजपसोबत युती बनवली होती. नितीश कुमार यांच्या पक्षातील शरद यादव आणि अली अन्वर या दोन खासदारांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता.

जनता दलच्या शरद यादव आणि अली अन्वर या दोन खासदारांनी पत्रकार परिषद घेत पक्षाचा निर्णय चुकीचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर लालू प्रसाद यांच्या पक्षाच्या एका मेळाव्याला खासदार शरद यादव आणि अली अन्वर गेले होते. यावरून खासदार शरद यादव आणि खासदार अली अन्वर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनता दल पक्षाने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली होती.

जनता दल पक्षाने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना यासंदर्भात एक पत्र देखील पाठवले होते. त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या दोन खासदारांना अपात्र ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाने देखील या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. पक्षाच्या विरोधात मतदान करणे, पक्षाच्या संदर्भात सदस्याचे वर्तन या सर्व कारणांमुळे सदस्याला अपात्र ठरविण्यात येते, असे सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी सांगितले होते.

त्यामुळे असाच निर्णय महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या संदर्भात देखील घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असाच निर्णय घेतल्यास एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नवीन गट स्थापन केल्यास त्यांना विधिमंडळाच्या सभागृहात नवीन गटाची मान्यता मिळवावी लागेल.

महत्वाच्या बातम्या :-
मुख्याध्यापकाने महिला शिक्षीकेला भर वर्गात चप्पलने मारले; घटनेमागील धक्कादायक कारण आले समोर
‘असं झालं तर आनंदच होईल’, महाराष्ट्रातील राजकारणावर गडकरींचा उद्धव ठाकरेंना सल्ला
जर असं झालं तर एकनाथ शिंदेंची सगळी मेहनत जाईल पाण्यात, समजून घ्या ‘हे’ राजकीय समीकरण

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now