Homeइतरसिंधुताईंच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्याऐवजी दफनविधी का करण्यात आला? जाणून घ्या कारण..

सिंधुताईंच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्याऐवजी दफनविधी का करण्यात आला? जाणून घ्या कारण..

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं दुःखद निधन झालं.वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात सिंधुताईंवर उपचार सुरू होते. त्यांच्यावर काल दुपारी पुण्यातील नवी पेठ येथील ठोसरपागा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. अग्निसंस्काराऐवजी त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं. अंत्यसंस्कार दफनविधी पद्धतीने करण्यात आल्याने याची चर्चा सर्वत्र होत आहे.

सिंधुताई यांच्या निधनाने अवघ्या भारतभर शोककळा पसरली आहे. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात काल दुपारी १२ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या दरम्यान अग्नीसंस्कारऐवजी त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. याची सर्वत्र चर्चा होत असताना आता खरे कारण समोर आले आहे. सिंधू ताईंच्याच संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सिंधुताई सपकाळ यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली होती. या पंथानुसार मृत व्यक्तीला अग्नी देण्याऐवजी त्याचे दफन करणे, अशी प्रथा आहे. या पंथाच्या रूढीपरंपरेनुसारच आपले अंत्यसंस्कार व्हावेत, अशी सिंधुताईंचीच इच्छा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सिंधुताईंच्या अंत्ययात्रेच्या दरम्यान श्री चक्रधर स्वामींच्या नावाचा जप करण्यात आला होता. तसंच, श्रीमद्भगवतगीतेच्या श्लोकांचंही उच्चारण करण्यात आलं होतं.

महानुभाव पंथात अग्नीसंस्कारऐवजी देह दफन करण्यात येण्याचे कारण म्हणजे, महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी खडकुली इथं वास्तव्यास असताना स्वामींच्या एका भक्ताचं निधन झालं. तेव्हा चक्रधर स्वामींनी त्या भक्ताचा दफनविधी करण्यास सांगितलं. तेव्हापासून महानुभाव पंथात याच पद्धतीनं अंत्यविधी करण्याची प्रथा सुरु झाली. महानुभाव पंथात या विधीला ‘भूमीडाग’ म्हटले जाते.

अभ्यासकांच्या मते, “विदर्भात या पंथाचा मोठा प्रसार झाल्याचं पाहायला मिळतं. ऋद्धीपूर हे त्यांचं मुख्य ठिकाण आहे. परमार्थामध्ये कुठल्याही जातीची व्यक्ती संन्यास घेऊ शकते असं देखील या पंथामध्ये सांगण्यात आलं आहे. महानुभाव पंथ स्विकारलेल्या व्यक्तीला दफन केले जाते. दफन करताना एक खड्डा केला जातो. त्या खड्ड्यात एक कपार केली जाते. त्या खड्ड्यात मीठ टाकतात त्यानंतर मृतदेह ठेवल्यानंतर वरुन पुन्हा एक दोन पोती मीठ टाकलं जातं. त्यानंतर माती टाकली जाते.”

तसेच,”पार्थिव दफन करण्यासाठी नेण्यापूर्वी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते. त्यानंतर डोलीमध्ये ठेवून दफन करण्यासाठी नेले जाते. दफनस्थळी गेल्यानंतरही गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते. भारतात असे अनेक पंथ आहेत ज्या पंथात संन्याशांचे दहन केले जात नाही तर दफन केले जाते. संन्यासी लोकांची समाधी देखील केली जाते.” असे या पंथाचे अभ्यासक सांगतात.

महत्वाच्या बातम्या
कतरिनाने विकीच्या नावाच्या मंगळसूत्राचा फोटो केला शेअर, लोकं म्हणाली हिंदू धर्म मनापासून स्विकारलास 
अजूनही वेळ गेलेली नाही, चला एक होऊया जितेंद्र आव्हाडांचे ओबीसी नेत्यांना आवाहन
“पाकीस्तानपासून १० मिनीटांच्या अंतरावर PM ला सुरक्षा देता येत नसेल तर तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही”