..म्हणुन आजचा दिवस ‘इंजिनिअर्स डे’ म्हणुन साजरा केला जातो

आज १५ सप्टेंबर आजचा दिवस भारतात इंजिनिअर्स डे म्हणुन साजरा केला जातो. आधुनिक भारतात अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका निभावणारे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनानिमित्त अभियंता दिवस (Engineers Day) साजरा केला जातो. चला तर मग जाणुन घेऊयात का आजचा दिवस ‘इंजिनिअर्स डे’ म्हणुन साजरा केला जातो.

ज्यावेळेस संशोधनाची साधने अत्यल्प होती त्यावेळी मोक्षगुंडम यांनी आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर अनेक नवनव्या गोष्टी तयार केल्या. त्याकाळी ते भारतातील अत्यंत हुशार आणि कल्पक असे इंजिनिअर म्हणून ओळखले जायचे.

आपल्या अनेक कल्पक गोष्टी त्यांनी सत्यात उतरवून देशासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांनी केलेल्या एकूण कार्याची भारत सरकारने देखील दखल घेत १९५५ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले.

मोक्षगुंडम हे फक्त अभियंताच नव्हते, तर कट्टर व थोर देशभक्तही होते. नदीवरचे बंधारे, पूल, पिण्याच्या पाण्याच्या योजना आदी यशस्वीरित्या तयार करण्यासाठी विश्र्वेश्वरय्या यांनी मोलाचे योगदान दिले. त्या काळात कृष्णराज सागर बंधारा, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, मैसूर सँडल ऑइल आणि सोप फॅक्टरी, मैसूर विद्यापीठ, बँक ऑफ मैसूरची निर्मिती विश्र्वेश्वरय्या यांनी केली.

बंगळुरूमध्ये १९१७ साली त्यांनी शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना केली. या संस्थेला नंतर त्यांचे नाव देण्यात आले. ते केवळ इंजिनीअरच नव्हे तर मैसूरचे १९ वे दिवाणही होते.

विश्र्वेश्वरय्या यांचा कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्म झाला. ब्रिटीशांनी पण त्यांना, त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे ‘नाईट’ (knight) या पुरस्काराने सन्मानित केले.

भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. काही ठिकाणी,विशेषतः त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात,या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.

अत्यंत कठीण असलेली इंजिनिअरिंगची अंतिम परीक्षा त्यांनी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केली. आणि या देशातील पहिले अभियंता बनण्याचा मान त्यांनी मिळवला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.