1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेला झालेली गर्दी, आलेले लोक, आणि राज ठाकरेंनी केलेले भाषण याची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. सभेनंतर राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना होऊ लागली.
राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणानंतर त्यांच्यावर पोलिसांनी घालून दिलेल्या अटी न पाळल्याने गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरातील सिटी पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरेंवर तीन कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. कलम 116 कलम 117 आणि कलम 153अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं ते राज ठाकरेंना का नाही जमलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल अधिक चर्चा देखील होताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरेंबद्दल सांगायचे झाल्यास, बाळासाहेब ठाकरे यांनी 1985पासून हिंदुत्ववाद स्विकारला.
1987 साली झालेलया विलेपार्लेची विधानसभा पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा देत ही निवडणूक जिंकली होती. पुढे 1988 च्या निवडणुकीदरम्यान शिवसेनाप्रमुखानी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची घोषणा केली.
त्यांनी औरंगाबादला संभाजीनगर बनवण्याच्या या घोषणेचा फायदा असा झाला की महापालिकेत शिवसेनेचे त्यानंतर 27 नगरसेवक निवडून आले. पुढे शिवसेनेच्या प्रत्येक प्रचारात हाच मुद्दा होता. 1995 ला शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात आले.
पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर 15 वर्ष आपल्या तब्यत असलेला गड सेनेला कायम राखायचा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचारात उतरले. सभेत शिवसेनाप्रमुखांचे भाषण सुरु असताना, मशीदीत आजान सुरु झाली. बाळासाहेब भाषण करताना थांबले.
सगळ्या मैदानात सन्नाटा पसरला. काही सेकंद झाली, आजान बंद झाली, बाळासाहेबांनी पॉज घेत पुन्हा भाषण सुरु केलं. त्यानंतर, बाळासाहेबांनी पहिलंच वाक्य टाकलं, हे! याचसाठी विचारतोय. तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर? बस्स, त्या एका वाक्यानं बाळासाहेबांनी त्यावेळची सभा जिंकली होती.
शिवाय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आम्हाला प्रत्येक धर्म प्यारा आहे. पण, त्यात राष्ट्रीयत्व असायला पाहिजे. जे मुस्लीमधर्मीय राष्ट्रीयत्व मानतात ते आमचे आहेत. तर आता दुसरीकडे औरंगाबाद मधील झालेल्या राज ठाकरेंच्या सभेबद्दल सांगायचे झाल्यास, भाषण सुरू असताना जेव्हा आजान सुरू झाली, तेव्हा राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी आजान सुरू झाल्यानंतर पोलीसांना आजान थांबवण्याची सुचना केली व आपले भाषण कायम ठेवलं.
पुढे राज ठाकरेंनी औरंगाबाद सभेत भोंग्यासंदर्भात 4 तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. जर मशिदीवर भोंगे काढले गेले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.