Share

Kolhapur Nandani Mahadevi Elephant: ‘वनतारा’ला नांदणीची महादेवी हत्तीणच का हवी होती? किरण मानेंनी सांगितलं सत्य

Kolhapur Nandani Mahadevi Elephant : कोल्हापूरच्या (Kolhapur) नांदणी (Nandani) गावातील मठामध्ये राहणारी लाडकी महादेवी हत्तीण काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील (Gujarat) वनतारा (Vantara) प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गावकऱ्यांच्या मनावर दगड ठेवून हा निर्णय मान्य करावा लागला. मात्र, या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) संतापाची लाट उसळली असून महादेवीला परत आणण्यासाठी जनआंदोलन सुरू आहे.

अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपला रोष व्यक्त केला आहे. त्यांचा आरोप आहे की वनतारा आणि ‘पेटा’ (PETA) संस्थेने मिळून ही संपूर्ण कारवाई रचली.

किरण मानेंचा आरोप 

मानेंच्या मते, वनताराला एक प्रशिक्षित हत्ती हवा होता. देशभर शोध घेतल्यानंतर दोन हत्तीणी निवडल्या एक केरळमधील आणि एक कोल्हापूरच्या नांदणीतील महादेवी. केरळने नकार दिल्यावर नांदणीकडे मोर्चा वळवला. पैशांचं आमिष दाखवून ‘सौदा’ करण्याचा प्रयत्न झाला, पण गावकऱ्यांनी नकार दिला.

यानंतर ‘पेटा’ची एन्ट्री झाली. पेटाच्या डॉक्टरांनी महादेवीच्या पायाला इजा असल्याचं सांगत नांदणीत तिची योग्य काळजी घेतली जात नसल्याचा आरोप केला. पण गावकऱ्यांनी स्वतःचा डॉक्टर बोलावून तपास केला आणि महादेवी ठणठणीत असल्याचं स्पष्ट झालं. तरीही सरकार आणि न्यायव्यवस्था पैशापुढे झुकली, असा मानेंचा आरोप आहे.

महादेवीची गावाशी नाळ

महादेवी आणि नांदणी गावाचं नातं अतूट होतं. गावात आलेलं प्रत्येक मूल आईवडिलांपूर्वी महादेवीला भेटायला जात असे. तिची मायेची सावली प्रत्येक घरावर होती. गाव सोडताना महादेवीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी गावकऱ्यांचं मन हेलावलं.

मानेंनी सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी ताडोबा अभयारण्यातून १३ हत्ती महाराष्ट्र सरकारने रिलायन्सला दिले होते, कारण सांगण्यात आलं होतं की प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आजवर गुजरातमध्ये एकही हत्ती नव्हता, पण आता तिथे अनेक हत्ती नेण्याची योजना असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, महादेवी नंतर कर्नाटकातील शेडबाळ, अकलनूर आणि बिचले येथील मठांच्या हत्तींवरही ‘पेटा’च्या नोटिसा गेल्या आहेत

किरण माने यांनी आपली पोस्ट संपवताना लिहिलं “धुआँ जो कुछ घरों से उठ रहा है… न पूरे शहर पर छाए, तो कहना !” यातून त्यांनी महादेवी प्रकरणाचा पुढेही मोठा परिणाम होईल, असा इशारा दिला.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now