Share

“बंडखोर आमदारांच्या राहण्या-खाण्याचा खर्च कोण करतंय?”, शिंदे गटातील बड्या नेत्याने केला खुलासा

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. सुरवातीला हे सर्व आमदार सुरतमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यानंतर हे सर्व बंडखोर आमदार विशेष विमानाने आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. सध्या हे सर्व आमदार गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

या सर्व बंडखोर आमदारांच्या राहण्या-खाण्याचा खर्च कोण करतंय? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रश्नांवर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाची आज एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

आमदार दीपक केसरकर म्हणाले की, “दुसऱ्या पक्षाचे आमदार जेव्हा हॉटेलात जातात, तेव्हा साध्य हॉटेलात राहतात का? आमच्या आमदारांचा पगार चांगला आहे. आम्ही काहीच फुकट घेत नाहीत. पैसे देत आहोत आणि ऑफिशिअली देत आहोत. त्यांच्याकडून काय असेल ती सवलत घेतो. पण पैसे भरूनच आम्ही या ठिकाणी राहत आहोत. कोणताही पक्ष आमचा खर्च करत नाही.”, असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

आमदार दीपक केसरकर पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बोलावलं होतं. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्या विमानात आम्ही बसलो आणि या ठिकाणी आलो आहोत. यामागे भाजप नाही”, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे.

“लोक फक्त शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येत नाहीत. असं असतं तर शिवसेनेच्या सर्वच सर्वजण निवडून आले असते. मते ही केवळ शिवसेनेच्या नावेच मिळत नाहीत”, असा खोचक टोला शिंदे गटात सामील असलेले आमदार दीपक केसरकर यांनी लगावला आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला होता.

“मते मागताना शिवसेनेच्या बापाच्या नावाने मागू नका, तर स्वतःच्या बापाच्या नावाने मागा”, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. एकनाथ शिंदे यांच्या गटाची आज एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिंदे गटाच्या नवीन रणनिती आखण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“शिंदे साहेब म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही, फक्त स्वत:ची काळजी घ्यायची अन् बरे व्हायचं”
गद्दारांना पक्षात परत घेणार नाही, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; बंडखोरांना धडकी
कोरोनाकाळात एकनाथ शिंदे घरी बसून राहिले नाहीत, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now