“किरीट सोमय्या कोण रे? पायतान हाना दोन रे”

कोल्हापूर । गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या राज्य सरकारमधील मंत्र्यांवर अनेक वेगवेगळे आरोप करत आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी १२७ कोटींच्या घोटाळ्यांचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आता आणखी काही घोटाळ्यांची माहिती उघड करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला असतानाही किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते. यामुळे मोठा राडा बघायला निळाला. कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमय्या यांचा निषेध केला.

याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोल्हापूर स्टेशनवर जमले होते. सोमय्या यांना जशास ततसे उत्तर दिले जाईल, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्या यांचे कोल्हापुरी पायतानाने स्वागत करु असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला. यामुळे प्रकरण तापले होते.

‘किरीट सोमय्या कोण रे, पायतान हाना दोन रे’, ‘वेलकम किरीट सोमय्या’, ‘बच्चा बच्चा जानता है, मुश्रीफ साहेब सच्चा है’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आदेश दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता उद्याचा दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती केली आहे. मात्र त्यांनी हा दौरा करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले होते.

सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मला चार तास घरात डांबून का ठेवले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गणेशोत्सवाचा काळ असल्याने पोलीस यंत्रणा ही गुंतलेली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना कोल्हापूर येथे येण्यास मज्जाव करण्यात आला, असे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.