मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परिचयाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. बॉलीवूडमध्ये संधी देण्याच्या बहाण्याने मुंडे यांनी आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचे सदर तरुणीचा दावा आहे. पोलीस आपली तक्रार दाखल करून घेत नसल्याचे ट्विटही तिने केले आहे.
मात्र त्यानंतर सोमवारी रात्री ओशिवरा पोलिसांनी तरुणीचा तक्रार अर्ज स्वीकारून अधिक तपास सुरू केला आहे. रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे.
या प्रकरणाबाबत बोलताना रेणू शर्मा यांनी दावा केला आहे की, १९९७ मध्ये रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख झाली. हे दोघे मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये बहिण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले होते. त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय १६ -१७ इतके होते. रेणू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा १९९८ मध्ये प्रेमविवाह झाला होता.
त्यानंतर करुणा या प्रसूतीसाठी २००६ मध्ये इंदोरमध्ये गेली होती. त्यावेळी मी घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेना माहिती होतं. धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा दावा रेणू शर्मा यांनी केला.
मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करून केले आरोपांचे खंडन
एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधांमधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांचा पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.
सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत.
मात्र २०१९ पासून सदर महिला व तिची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीवाला गंभीर शारीरिक इजा पोहोचवण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ देखील सहभागी होता.
मोबाईलवरुन ब्लॅकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएमएसचे पुरावे माझ्याकडे आहेत. दबाव तंत्राचा हा भाग असू शकतो. या सर्व प्रकरणाची संबंधितांकडून योग्य चौकशी केली जाईल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही; किरीट सोमय्या बरसले
कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले…
शेतकरी आंदोलन : सुप्रिया सुळेंनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार; मोदी सरकारकडे केली ‘ही’ मागणी