Share

Pravin Gaikwad: ‘अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा’ मोहिमेने ५२ देशांत बहुजनांच्या लेकरांचे भविष्य घडवणारे प्रवीण गायकवाड कोण ?

Pravin Gaikwad: संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर अलीकडे अक्कलकोट (Akkalkot) येथे झालेल्या शाईफेक प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. पण या घटनांपलीकडे पाहिल्यास गायकवाड हे एक अभ्यासू, द्रष्टे आणि बहुजन समाजासाठी कार्य करणारे विचारवंत नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी “आरक्षणाकडून अर्थकारणाकडे” ही नवी दिशा दाखवत बहुजन तरुणांना केवळ स्थानिक नव्हे, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवले आहे.

‘अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा’ मोहिमेची संकल्पना

प्रवीण गायकवाड यांनी 2015 पासून ‘अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ ही चळवळ सुरू केली. मराठा आरक्षणाच्या कायदेशीर अडथळ्यांमुळे युवापिढीला सशक्त बनवण्यासाठी त्यांनी बहुजन समाजाच्या तरुणांना परदेशात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या संधी शोधण्यासाठी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. या उपक्रमात सहभागी असलेल्या अजयसिंह सावंत (Ajaysingh Sawant) यांच्या मते, या मोहिमेमुळे आतापर्यंत ५२ देशांमध्ये शेकडो तरुण पोहोचले आहेत.

या चळवळीचा मूलमंत्र ‘डोक्यात शिवाजी, खिशात गांधीजी’ असा असून इतिहासाची प्रेरणा घेत सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन साधण्याचा गायकवाड यांचा प्रयत्न आहे. भारतातील तंजावरपासून (Tanjavur) ते पेशावर (Peshawar) ही संकल्पना घेऊन त्यांनी ती जागतिक पातळीवर ‘ऑस्ट्रेलिया ते कॅनडा’ या रूपात पुढे नेली.

अर्थकारणातून सशक्तीकरणाचा मार्ग

गायकवाड यांचा विश्वास आहे की केवळ आरक्षणाच्या आधारावर समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. त्यामुळे त्यांनी आरक्षणाच्या भावनिक चर्चेत अडकून न राहता, समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ते म्हणतात की, आरक्षणासाठीचा लढा गेल्या ४० वर्षांपासून सुरू आहे. तरीही समाजाच्या हातात काहीही शाश्वत लाभ आलेला नाही. त्यामुळे नव्या पिढीला आर्थिक शिस्त, जागतिक संधी आणि कौशल्याधारित प्रशिक्षण दिल्यास समाजाचा खरा विकास होईल.

संभाजी ब्रिगेडची पुढाकाराची भूमिका

गायकवाड यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेडने ‘आरक्षणाकडून अर्थकारणाकडे’ हे घोषवाक्य रौप्यमहोत्सवी अधिवेशनात मांडले. त्यामागचा उद्देश स्पष्ट आहे. आता समाजाला फक्त आरक्षणाच्या आशेवर न ठेवता, जागतिक आर्थिक स्पर्धेत टिकवण्यासाठी दिशा देणे. त्यांनी केरळ, पंजाब, गुजराती, सिंधी, तमिळ समाजाच्या परदेशातील आर्थिक यशाचे उदाहरण देत, मराठा समाजालाही तशी वाट चोखाळावी, असे ठाम मत मांडले.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now