Share

कोण आहेत भगवंत मान, ज्यांना आपने केले आहे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; जाणून घ्या

आम आदमी पार्टी (AAP) ने २०२२च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपले मुख्यमंत्री उमेदवार म्हणून भगवंत मान यांच्या नावाची घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी याची घोषणा केली. केजरीवाल म्हणाले की, भगवंत मान यांना फोन आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ९३ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत.

भगवंत सिंह मान यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९७३ रोजी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यात झाला. सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी शहीद उधम सिंग शासकीय महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मान कॉलेजच्या वेळेपासूनच  त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध झाले.

युथ कॉमेडी फेस्टिव्हल आणि आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला. जिथे त्यांना दोन सुवर्णपदके मिळाली. राजकारणात येण्यापूर्वी मान केवळ अभिनेता आणि विनोदी कलाकार म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

राजकारण्यांवर समाचार घेणाऱ्या आणि राजकारणावर विडंबन करणाऱ्या भगवंत मान यांनी २०११ मध्ये राजकारणात प्रवेश केला. २०११ च्या सुरुवातीस, मान यांनी पीपल्स पार्टी ऑफ पंजाबमध्ये प्रवेश केला आणि लेहरा मतदारसंघातूनही निवडणूक लढवली. मात्र, येथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

AAP मध्ये सामील झाले – अण्णा आंदोलनातून बाहेर पडलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली, त्यानंतर भगवंत मान या पक्षात आले. भगवंत मान २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘आप’मध्ये सामील झाले आणि त्यांच्या मूळ जिल्हा, संगरूर लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले.

त्यानंतर मान दोन लाख मतांच्या फरकाने विजयी झाले. मान यांच्या विजयामुळे ते पंजाबमध्ये ‘आप’चा चेहरा बनले. यानंतर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जलालाबादमधून सुखबीर सिंग बादल आणि रवनीत सिंग बिट्टू यांच्या विरोधात निवडणूक लढवली. तेथून ते बादल यांच्याकडून १८,००० मतांच्या फरकाने पराभूत झाले.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भगवंत मान यांना संगरूरमधून पुन्हा उमेदवारी दिली. मान यावेळी केजरीवाल यांच्या अपेक्षेवर ठाम राहिले आणि पुन्हा विजयी झाले. २०१९ मध्ये पंजाबमध्ये ‘आप’चा कोणताही उमेदवार विजयी झाला नव्हता. यासोबतच भगवंत मान हे कोणत्याही मोठ्या प्रतिस्पर्ध्याशिवाय राज्यातील ‘आप’चा सर्वात प्रमुख चेहरा बनले आहेत.

आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर भगवंत मान म्हणाले की, मी एक सैनिक असून, त्यांना पंजाबची शान परत आणायची आहे. मान म्हणाले- “मी नेहमी म्हणतो की मी सैनिक आहे. राजकारणात आल्यानंतर माझे आयुष्य बदलले. जेव्हा मी कॉमेडी करायचो तेव्हा लोक मला भेटल्यावर हसायचे. आता लोकांच्या माझ्यावर आशा आहेत. जेव्हा ते मला पाहतात तेव्हा ते रडतात आणि म्हणतात आम्हाला वाचवा.”

 

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now