मोदींविरोधात राष्ट्रीय बेरोजगार मोहीम सुरू असतानाच राज्य सरकारकडून सर्वांत मोठी भरती जाहीर  

मुंबई । राज्य सरकारने कोरोना काळात एक आनंदाची बातमी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे.

याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येईल, असे अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर सांगितले.

यामध्ये पोलीस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे आहेत. तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी एकूण 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येणार आहेत.

सध्या सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला आदेश दिले आहे.

सध्या कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तसेच अनेक तरुण हे रोजगाराच्या शोधात आहेत. यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकार विरोधात सध्या राष्ट्रीय बेरोजगारी दिन विरोधक साजरा करत आहेत. बेरोजगारीवरून मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. यामुळे आता राज्य शासनाने  घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.