अजितदादा पुण्यातील लुटारू रुग्णालयांवर कारवाई कधी होणार? पुणेकरांचा सवाल

पुणे। राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात पुण्यात देखील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून रोज पाचशेच्यावर जात आहे. रुग्ण वाढत असल्याने महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत आहे.

खासगी रुग्णालयांवरदेखील जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण उरलेले नाही. अनेक छोट्या-मोठ्या रुग्णालयात जनरल वॉर्डसाठी दिवसाला पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. मुख्यतः नावाजलेली रुग्णालये यात आघाडीवर आहेत.

रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांकडून लूट होत असल्याची माहिती त्यांच्या कानावर जात नाही का? असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे.

रुग्णालयांकडून सुरू असलेली लूट महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या लक्षात का येत नाही? असे सामान्य जनतेकडून विचारण्यात येत आहे. पुण्यातील सर्व रुग्णालयातील खाटा प्रशासनाने खरोखरच ताब्यात घेतल्या असतील, तर रुग्णांना परत का पाठविण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाला कोणत्या रूग्णालयाकडून किती शुल्क घेण्यात येते, याची पुरेशी कल्पना आहे. मात्र, कारवाई कुणीच करत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तरी अनेक रुग्णांना घरीच राहण्याची वेळ आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.