Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सिडकोमध्ये (CIDCO) झालेल्या 5 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत, रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर आरोप करत सांगितले की, सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला (Biwalkar Family) सुमारे 150 एकर जमीन दिली आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि संजय शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा होण्याची मागणी केली होती.
फडणवीसांचे आव्हान आणि रोहित पवारांचा प्रतिसाद
मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर “असे आरोप रोज केले जातात, पुरावे द्या” असे आव्हान दिले होते. त्यावर सोमवारी पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी तब्बल 12 हजार पानांचे बॅग भरून पुरावे सादर केले. या कागदपत्रांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली आहे.
रोहित पवार म्हणाले, “सिडकोचे चेअरमन असताना मंत्री संजय शिरसाट यांनी हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. आमच्या कडे पुरावे आहेत. आमच्यावर टीका करणाऱ्यांना सांगतो, महादेवाने आम्हाला बुद्धी दिली आहे आणि आम्ही ती वापरून भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. फडणवीसांनी सांगितले पुरावे सादर करा, आम्ही 12 हजार पानांचे पुरावे बॅग भरून आणले आहेत.”
बिवलकर कुटुंबाचे जमिनीचे अर्ज व विवाद
नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाने 1992 आणि 1995 साली 12-12 टक्के जमिनीसाठी अर्ज केले होते, जे फेटाळण्यात आले. सिडकोने स्पष्ट केले की, त्यांना 12.5 टक्के योजनेचा लाभ देता येणार नाही. मात्र 1 मार्च 2025 रोजी नगर विकास विभागाने बिवलकरांना जमीन देण्याचे आदेश दिले. सिडकोच्या एमडी विजय सिंघल (Vijay Singhal) यांनी हे लक्षात आणून चेअरमन नेमा केले, त्यानंतर संजय शिरसाट यांनी बिवलकरांना जमीन दिली, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांना सवाल
रोहित पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना ही जमीन कशी दिली? ही कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन नाही का? 5 हजार कोटींची जमीन बिवलकरांनी बिल्डरांना विकली, आता ही जमीन अडचणीत येणार आहे. या प्रकरणात तुम्ही पुढे काय करणार आहात?”
पुरावे बॅग भरून सादर
रोहित पवारांनी सांगितले की, 48 तासात फाईल्स 30-32 टेबलवरून सरकली आणि तत्काळ 5 हजार कोटींच्या भूखंड वाटप झाले. तथापि, वर्षानुवर्षे साडे बारा टक्के जमीन वाटप होत नाही. ट्रकभर किंवा गाडी भरून नाही, तर बॅग भरून 12 हजार पानांचे पुरावे आम्ही सादर करत आहोत. शिरसाट यांना तत्काळ पदावरून बाजूला करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.