Parinay Fuke: शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये अन् सुट्टीसाठी युरोपात जाणारे मराठीचं रक्षण काय करणार; भाजपचा ठाकरेंवर घणाघात

Parinay Fuke: राज्य शासनाने त्रिभाषा धोरणावरचा (Trilingual Policy) हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्या संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन ५ जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम (Worli Dome, Mumbai) येथे करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी ठाकरेंच्या या मेळाव्यावर एक उपरोधिक कविता सादर करत घणाघात केला आहे.

परिणय फुके यांची उपरोधिक कविता

परिणय फुके यांनी सादर केलेल्या कवितेत ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडण्यात आले. त्यांनी म्हटले की :

“घरात आईला म्हणणार मम्मी, मोर्चामध्ये जाणार आम्ही
कॉन्व्हेंटमध्ये घेणार शिक्षण, मराठीचं करणार रक्षण
सुट्टीसाठी आहे युरोप, दुसऱ्यांवर करणार आरोप
सत्तेसाठी वेगळे झालो, आता सत्तेसाठी एकत्र आलो
लाथाडले जनतेने, आता काय करतील कोण जाणे
हिंदुत्वाचे कधी दुकान, कधी प्यारे टिपू सुलतान
कास मराठीची धरली, निवडणुकीत केम छो वरळी
धारावीत दाखवला रुबाब, लुंगी बहादूर छोटे नवाब
भारतभर भाराभर चिंध्या, एक ना धड अस्तित्वाची धडपड
बुडाखालून गेल्या खुर्च्या, म्हणून मराठीचा मोर्चा
मोडीत काढला ठाकरे ब्रँड, आता चहूबाजूंनी वाजला बँड”

या कवितेतून त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर आणि राजकीय भूमिकेवर टीका करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मेळावा केवळ राजकीय सोयीसाठी असल्याचा आरोप केला.

फुके यांचा टोला

भाजप आमदार परिणय फुके यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, “५ जुलैचा हा मेळावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आभार मेळाव्यासारखा साजरा व्हायला हवा, कारण हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय हा फडणवीस यांच्या नेतृत्वात झाला.”

ठाकरे बंधूंचा संयुक्त मेळावा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ५ जुलै रोजी प्रथमच एका मोठ्या सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात सुरू झालेल्या मोहिमेनंतर सरकारने निर्णय मागे घेतला आणि त्याच विजयाचा जल्लोष करण्यासाठी हा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने ‘मराठी एकजूट’ पुन्हा एकदा केंद्रस्थानी येत असल्याचे चित्र आहे.