Prakash Mahajan Resign : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी अखेर आपला प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणून निरोप दिला. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत महाजन नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर गुरुवारी त्यांनी अधिकृतपणे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली.
प्रकाश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, “मला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं गेलं नाही. ११ तारखेच्या बैठकीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) माझ्या कार्याची किंमत नाकारली आणि मला प्रतिसादही मिळाला नाही. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रकरणात मला मदत मिळाली नाही, मी एकटाच लढलो. पक्षात जिथे सन्मान नाही तिथे राहायचं नाही.”
महाजन यांनी पुढे स्पष्ट केलं की, “अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याविरोधात उमेदवार का दिला याबाबत विचारणा केली, तेच कारणाने मला विरोध केला गेला. स्टेजवर बसण्यासाठी लोकांना विचारावे लागत होते, तरीही मला कुणी पाठिंबा दिला नाही. राज ठाकरे यांनी बोलावलं असतं तर मला थांबण्याचा किंवा पुढे जाण्याचा निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार होता. सोशल मीडियावर मी राजीनामा दिला असून राजकीय संन्यास मी मानत नाही.”
राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला हा राजीनामा राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील घट्ट मैत्रीमुळे अधिक तणावपूर्ण ठरला आहे, असेही सांगितले जात आहे. प्रकाश महाजन हे दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांचे धाकटे भाऊ असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय आहेत. त्यांनी मराठवाड्यातील प्रमुख नेता म्हणून पक्षाची ताकद वाढवली होती.
या राजीनाम्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का बसला आहे आणि पुढे प्रकाश महाजन काय राजकीय निर्णय घेतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.