Homeखेळकोहलीच्या कॅप्टनसीच्या बैठकीत काय घडलं? चेतन शर्मा यांनी केला मोठा खुलासा...

कोहलीच्या कॅप्टनसीच्या बैठकीत काय घडलं? चेतन शर्मा यांनी केला मोठा खुलासा…

विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता ‘चेतन शर्मा’ यांनी आपली बाजू मांडली आहे. चेतन शर्मा यांनी सांगितले की, बीसीसीआयने विराट कोहलीला टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती. यासोबतच कर्णधारपदाच्या निर्णयावर बोर्ड टी-२० विश्वचषकानंतर त्याच्याशी चर्चा करेल, असेही बोर्डाने सांगितले होते. पण कोहलीला ते मान्य नव्हते. टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

शुक्रवार, ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी चेतन शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली होती. रोहित शर्मा अनफिट असल्यामुळे एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. तर ऋतुराज गायकवाडचा वनडे संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाची घोषणा करताना चेतन शर्माने विराट कोहली आणि बीसीसीआयमधील वादावर खुलेपणाने बोलले.

ऑनलाइन पत्रकार परिषदेत चेतन शर्मा म्हणाले, कोहलीच्या या निर्णयाचा परिणाम टी-२० विश्वचषकावर होईल, असे सर्व निवडकर्त्यांना वाटत होते. विश्वचषकानंतर याबाबत बोलू, असे आम्ही विराटला सांगितले. कोहली हा टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे आणि संपूर्ण टीम त्याच्याभोवती फिरते. आम्ही त्याचा खूप आदर करतो. सरतेशेवटी, भारतीय क्रिकेटला फायदा व्हावा, अशी आपली सर्वांची इच्छा आहे.

चेतन शर्मा पुढे म्हणाले, “निवडकर्त्यांसाठी हा कठीण निर्णय होता. मात्र निवडकर्त्यांना कठीण निर्णय घ्यावे लागतात. बैठकीत कोहलीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांनी कोहलीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले. आम्ही त्याला सांगितले की विश्वचषकानंतर आपण या विषयावर बोलू. त्याचा परिणाम विश्वचषकावर होईल असे आम्हाला वाटले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कोहली म्हणाला होता की, टी-२० चे कर्णधारपद सोडण्यापूर्वी त्याला कोणीही विनंती केली नव्हती. यानंतर सोशल मीडियावर बीसीसीआयवर बरीच टीका झाली होती आणि बीसीसीआयनेही आपली बाजू मांडावी, अशी सर्वांची मागणी होती.

याशिवाय चेतन शर्माने कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद हिसकावून घेण्याबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले, ‘जेव्हा कोहलीने सांगितले की, मी टी-२० चे कर्णधारपद सोडत आहे. तेव्हा याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नव्हती कि, व्हाईट बॉलसाठी दोन वेगळे कर्णधार नसतील. आम्हाला त्यावेळी वातावरण शांत करायचे होते कारण टी-२० विश्व सुरू होणार होते.

विराट कोहली कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने सेंच्युरियन कसोटीतही भारताला विजय मिळवून दिला. आता टीम इंडियाच्या नजरा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्यावर आहेत. पुढील कसोटी जोहान्सबर्ग येथे खेळली जाईल.