काय सांगता! आता ऍम्ब्युलन्स म्हणून रुग्णांच्या मदतीला धावणार टॅक्सी

 

कल्याण। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा धोका वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर अत्यवस्थ रुग्णांसोबतच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या.

सातत्याने येणाऱ्या या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून या ऍम्ब्युलन्सचा वॉररूममधून नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता ऍम्ब्युलन्स बरोबरचं काळ्या पिवळ्या टॅक्सीसह, बसेसदेखील नव्याने भाडे करारावर घेण्यात आल्या आहेत.

या गाड्यांचा वापरदेखील संशयित रुग्णांना विलगीकरणात नेण्यासाठी केला जाणार आहे. रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या टॅक्सीमध्ये खास पार्टिशन करण्यात आले आहेत.

नागरिकांनी वॉररूममधील दूरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर संबंधितांना तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल. अशी माहिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोना रुग्णांची अतिशय झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी येथे ४१२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली.

ज्यानंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ९,४९९ वर पोहचला आहे. ज्यामध्ये सध्या ५,३२३ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून ४,०३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.