Share

Vaishnavi Hagavane : वैष्णवीने आणलेल्या 51 तोळे सोन्याचं हगवणेंनी काय केलं? धक्कादायक माहिती आली समोर, फॉर्च्युनर केली जप्त

Vaishnavi Hagavane : मुळशीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबातील सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे आणि पोलिस तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांमुळे हा गुन्हा आता अधिक गडद बनत चालला आहे.

पाईपने मारहाण : शवविच्छेदन अहवालाने स्पष्ट केलेले गंभीर वास्तव

शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर पाईपने मारहाणीच्या स्पष्ट खुणा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तपासादरम्यान मारहाण करण्यासाठी वापरलेला लोखंडी पाइप, गळफास घेण्यासाठी वापरलेली साडी आणि स्टूल जप्त केले आहे. याशिवाय सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले असून, घटनास्थळी अनेक वस्तूंचे पंचनामे करण्यात आले आहेत.

आत्महत्या की खून? – वडिलांचा संशय अधिकच गडद

वैष्णवीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, जमीन खरेदीसाठी आर्थिक मागण्या आणि त्यातून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळामुळे 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केली, असा दावा केला जात असला तरी वैष्णवीच्या अंगावरील जखमा आणि इतर पुरावे पाहता, तिचा खून झाला असावा, असा गंभीर आरोप वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे.

पोलिस कारवाई : पती, सासू, नणंद कोठडीत, सासरे व दीर फरार

या प्रकरणात पती शशांक हगवणे, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना अटक करण्यात आली असून, त्यांची पोलिस कोठडी 26 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे हे अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.

कलमवाढ : आता हत्या, छळ आणि स्त्रीधन हडप करण्याचे आरोप

तपासादरम्यान वैष्णवीच्या मृत्यूच्या कारणांबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2) अंतर्गत ‘हत्यारांनी दुखापत’ आणि इतर गंभीर कलमे गुन्ह्यात समाविष्ट केली आहेत. सरकारी वकील नितीन अडागळे यांनी आरोपींची कोठडी वाढवण्याची याचिका सादर केली होती, जी न्यायालयाने मंजूर केली.

स्त्रीधनाचा गैरवापर : 51 तोळे सोने तारण

लग्नावेळी वैष्णवीला मिळालेले 51 तोळे सोने आरोपींनी खासगी बँकेत तारण ठेवल्याची माहिती उघड झाली आहे. या व्यवहाराच्या चौकशीसाठी पोलिसांनी संबंधित बँकेशी पत्रव्यवहार केला असून, आरोपींचे लॉकर गोठविण्यासाठीही पावले उचलली आहेत. वैष्णवीच्या नावे असलेली आलिशान फॉर्च्युनर कार आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आता केवळ आत्महत्येपुरते मर्यादित न राहता, शारीरिक हिंसाचार, मानसिक छळ, हुंडाबळी, आणि स्त्रीधनाच्या शोषणाचा व्यापक गुन्हा असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पोलिस तपास वेगात सुरू असून, फरार आरोपींच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
what-did-hagavane-do-with-the-51-tolas-of-gold-brought-by-vaishnavi-hagavane

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now