Homeताज्या बातम्याज्या रॅलीमध्ये मोदी पोहोचू शकले नाहीत तिथल्या खुर्च्या खरंच रिकाम्या होत्या का?...

ज्या रॅलीमध्ये मोदी पोहोचू शकले नाहीत तिथल्या खुर्च्या खरंच रिकाम्या होत्या का? वाचा यामागचं सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे ५ जानेवारी रोजी निवडणूक रॅली होती. कृषी कायदा मागे घेतल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच पंजाबमध्ये पोहोचले. रॅलीसोबतच फिरोजपूरमध्ये ४२ हजार ७५० कोटींच्या विकासकामांची पायाभरणीही होणार होती. मात्र ही रॅली अचानक रद्द करण्यात आली. खराब हवामानामुळे रॅली रद्द करण्यात आल्याचे आधी सांगण्यात आले. मात्र त्यानंतर सुरक्षेचे कारण सांगण्यात आले.

सायंकाळपर्यंत हे प्रकरण भाजप आणि काँग्रेससाठी राजकारणाचा आखाडा बनले. गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत उत्तर मागितले असताना, काँग्रेसने रॅली रिक्त पडण्याच्या भीतीने रॅली रद्द केल्याचा आरोप केला. पण प्रत्यक्षात फिरोजपूर येथील रॅलीच्या ठिकाणी काय घडले? खुर्च्या खरोखर रिकाम्या होत्या का?

बुधवारच्या घटनेनंतर दिल्लीला परतताना पंतप्रधान मोदींनी भटिंडा विमानतळावर अधिकाऱ्यांना सांगितले, तुमच्या मुख्यमंत्र्यांना थॅन्क्स बोला भटिंडा विमानतळापर्यंत मी जिवंत परत येऊ शकलो.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याबद्दल भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधानांच्या हत्येचा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. पक्षाच्या युवा शाखेचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर सिंग बग्गा यांनी लिहिले, काँग्रेसला पंतप्रधान मोदींना मारायचे होते, पण ज्याच्यावर १२५ कोटी भारतीयांचा आशीर्वाद आहे, कोण काय बिघडवेल?

त्याचवेळी रॅलीत रिकाम्या खुर्च्या पाहून पंतप्रधान मोदी परतले असा आरोप काँग्रेसने केला आहे. रणदीप सिंग सुरजेवाला यांनी ट्विटरवर लिहिले आहे. रॅली रद्द होण्याचे कारण रिकाम्या खुर्च्या होत्या. विश्वास बसत नसेल तर बघा… आणि हो, नको ती विधाने करू नका, शेतकरी विरोधी मानसिकतेचे सत्य स्वीकारा आणि आत्मपरीक्षण करा. पंजाबच्या जनतेने रॅलीपासून अंतर ठेऊन अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे.

दुसरीकडे, या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनीही ‘रिक्त खुर्च्या’बद्दल पंतप्रधान मोदींवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, इथे कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता आणि नाही. पण तरीही पंतप्रधानांच्या टीमने परत जाण्याचा निर्णय घेतला. याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आमच्या पंतप्रधानांना पूर्ण आदरातिथ्य आणि प्रेम देतो आणि देत राहू… पंतप्रधानांच्या सभेसाठी ७० हजार खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, पण फक्त ७०० लोक जमले. यात मी काय करू शकतो?

भारतात प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार रॅलीत फक्त पाच हजार लोक पोहोचले होते, तर भाजपच्या राज्य युनिटने पाच लाख लोकांचा दावा केला होता. रॅलीच्या ठिकाणी लोकांना आणण्यासाठी भाजपने ३ हजार २०० बसेसची व्यवस्था केली होती, तरीही सभेला गर्दी जमू शकली नाही.

बातमीनुसार, राज्यातील काही निवडणूक भागात सुमारे ६० बसेस पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, पंतप्रधानांच्या रॅलीला अपेक्षेप्रमाणे गर्दी होणार नाही याची कल्पना पक्षाला मिळाली आणि त्यामुळे रॅलीच्या ठिकाणी फक्त ५०० बसेससाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. या अहवालानुसार रॅलीतील ६५ हजार खुर्च्यांपैकी केवळ ५ हजार खुर्च्यांवर लोक बसले होते.

कमी बसेस घटनास्थळी येण्यापासून रोखल्याचा दावा भाजपने केला आहे. मात्र, पंजाब भाजपच्या प्रमुख अश्विनी शर्मा यांनी नुकताच दावा केला होता की या रॅलीमध्ये पाच लाख लोक जमतील आणि पंजाबच्या इतिहासातील ही सर्वात मोठी रॅली असेल.

फिरोजपूर येथील रिपोर्टरने सांगितले, ११ वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला त्यामुळे कमी लोक येऊ शकले. तंबू फक्त व्हीआयपी परिसरातच लावण्यात आले होते. उर्वरित भागामध्ये पावसामुळे लोक भिजत होते, त्यामुळे आधीच उपस्थित असलेले लोक पावसापासून संरक्षण न मिळाल्याने परत जाऊ लागले. त्यानंतर १२.३० वाजता पाऊस कमी झाल्यावर लोकांचे आगमन झाले, परंतु भाजपच्या अपेक्षेइतके लोक पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे खुर्च्या रिकाम्या राहिल्या.

सुरक्षा क्षेत्रामुळे रॅलीच्या ठिकाणी फक्त पास असलेल्या बसमध्ये आलेल्या लोकांनाच प्रवेश दिला जात होता, स्वतःच्या गाडीतून आलेल्या लोकांना नाही. त्याच वेळी, शेतकऱ्यांचा निषेध देखील झाला, त्यामुळे लोक कमी आले. कार्यक्रमाच्या १० किलोमीटर आधी पंतप्रधानांचा मार्ग स्पष्ट नव्हता, जाम झाला होता, त्यामुळेच पंतप्रधान परत गेले.

रिपोर्टरच्या म्हणण्यानुसार, भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे की कार्यकर्त्यांना रॅलीच्या ठिकाणी येऊ दिले जात नाही. फिरोजपूर परिसरातील शेतकऱ्यांनी ३००० हून अधिक बसेस रोखल्या. ते अडथळे आणत होते.